रिझर्व्ह बँकेने सहा बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच दिवसात ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे नियम आणि नियामक चौकटीचे पालन न केल्याबद्दल हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी (ता.६) मुंबईतील साहेबराव देशमुख सहकारी बँक आणि सांगली सहकारी बँक, दिल्लीतील रामगढिया सहकारी बँक, मुंबईतील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, इंडियन बँक, केरळमधील एर्नाकुलम येथील मुथूट मनी यांच्यावर कारवाई केली. रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले त्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन तयार
साहेबराव देशमुख सहकारी बँकेचा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश मागील वर्षी देण्यात आले होते. आता रिझर्व्ह बँकेने याला मुतदवाढ दिली आहे. यामुळे ८ जुलैपर्यंत या बँकेचा व्यवसाय बंद राहणार आहे. याचबरोबर सांगली सहकारी बँक आणि रामगढिया सहकारी बँकेला व्यवसाय बंद ठेवण्यास ८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश म्हणजे बँकेचा परवाना रद्द होत नाही, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसला ६ कोटी ७७ लाखांचा दंड केला आहे. या वित्तीय संस्थेच्या वित्तीय स्थितीची तपासणी रिझर्व्ह बँकेने केली होती. या संस्थेने कर्जदारांना कर्ज देताना व्याजाची व्यवस्थित माहिती दिली नव्हती. जादा व्याजदराची आकारणी करताना त्याची सूचनाही कर्जदारांना करण्यात आलेली नव्हती. याबाबत वित्तीय संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर आता रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
हेही वाचा >>> पुणे : लोकप्रतिनिधींकडे खंडणी मागणाऱ्या तरुणाला अटक
इंडियन बँकेला ५५ लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने केला आहे. या बँकेत मोठा गैरव्यवहार समोर आला होता. याबाबतच्या अहवालांची तपासणी रिझर्व्ह बँकेने केली होती. बँकेने नियमबाह्य कामकाज केल्याचेही निदर्शनास आले होते. बँकेने ग्राहकांच्या ‘केवायसी’ नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळे आधी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि आता दंड ठोठावण्यात आला आहे.
मुथूट मनीला १० लाख ५० हजार रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे. या वित्तीय संस्थेची वित्तीय स्थितीची तपासणी रिझर्व्ह बँकेने केली होती. संस्थेत झालेल्या गैरव्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली नसल्याची बाब त्यावेळी समोर आली होती. या प्रकरणी संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली गेली होती. आता संस्थेला दंड करण्यात आला आहे.
—————-
रिझर्व्ह बँकेची कारवाई
– साहेबराव देशमुख सहकारी बँकेचा (मुंबई) व्यवसाय बंद ठेवण्यास मुदतवाढ
– सांगली सहकारी बँकेचा (मुंबई) व्यवसाय बंद ठेवण्यास मुदतवाढ
– रामगढिया सहकारी बँकेचा (दिल्ली) व्यवसाय बंद ठेवण्यास मुदतवाढ
– महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसला ६ कोटी ७७ लाखांचा दंड
– इंडियन बँकेला ५५ लाखांचा दंड – मुथूट मनीला १० लाख ५० हजारांचा दंड