लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) होणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदवीपूर्व (सीयुईटी-युजी) या परीक्षेच्या अर्जांसाठी ९ ते ११ एप्रिलदरम्यान अर्ज प्रक्रिया पुन्हा खुली करण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून याबाबत मागणी करण्यात आल्याने अर्ज भरण्यासाठी पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागू नयेत यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) गेल्यावर्षी सीयूईटी परीक्षा सुरू केली. गेल्यावर्षी एकूण ९० विद्यापीठांनी सीयूईटीमध्ये सहभाग घेतला होता. त्यातील ४४ केंद्रीय विद्यापीठे होती. यंदाची सीयूईटी २१ मेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत ३० मार्च होती. यंदाच्या परीक्षेत २४२ विद्यापीठे सहभागी झाली आहेत. सीयूईटी-युजी परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्येत ४ लाखांनी वाढ झाली आहे. आता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याने अर्जसंख्येत वाढ होईल.
या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची पुन्हा संधी देण्याबाबत युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली. ‘सीयुईटी-युजी परीक्षेचे अर्जांसाठी संधी देण्याची मागणी अनेक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे ९ ते ११ एप्रिलदरम्यान संकेतस्थळ अर्ज भरण्यासाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिक माहिती cuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे प्रा. जगदेशकुमार यांनी नमूद केले आहे.