साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूट यांच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आरोग्यमंत्री राजेश टोपे,काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह आजी माजी मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मी हळुवार पावले टाकत पुढे जात आहे असेही म्हटले.
“सर्वात आधी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण शरद पवारांनी मला प्रेमाने या परिषदेसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली होते. पण सर्वांना कल्पना आहे की मी हळुवार पावले टाकत पुढे जात आहे. या पुढच्या कार्यक्रमांना मी नक्की आपल्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहीन असं वचन देतो. मी शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे भाषण ऐकली आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून काय मनोगत व्यक्त करायचे हा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आभार प्रदर्शन करतील असं सांगितले असते तर अधिक उचित ठरले असते. कारण आम्ही शहरीबाबू आहोत. शहरी माणसाचा साखरेसोबत चहात साखर किती एवढाच संबंध येतो. पण आता साखरेपासून इथेनॉल निर्मितीची सुरुवात झाली आहे. या पुढच्या काळामध्ये चहाबरोबर गाडीत साखर किती हा प्रश्न शहरातील माणसे विचारायला लागतील,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला साखर उद्योगातील काही कळते अशातला काही भाग नाही. साखरेचा विषय येतो तेव्हा मी माझ्या दोन्ही बाजूला असणाऱ्या अजित पवारांकडे आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहतो. हे लोक मार्ग काढत पुढे जात असतात. साखरेचे विश्व आहे हे लक्षात घेऊन त्याची अमर्याद क्षमता असल्याने त्याचे नियोजन करणे फार गरजेचे आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
“साखर कारखानदार, शेतकरी, उसतोड कामगार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतील तर त्यांच्या आयुष्याला आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे. साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. साखर महासंघाने या उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करायला हवेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटीत करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्क आहे. आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. मात्र त्यांना नवे तंत्र आणि नियेाजन याबाबत मार्गदर्शन करावे लागेल. राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यसाठी प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्विकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
“इथेनॉल कडे एक पर्यायी इंधन म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील. उसाचे पीक सूक्ष्म सिंचनाखाली कसे आणता येईल याचा विचार व्हायला हवा,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.