शहरातील झाडे काँक्रिटीकरणाच्या अतिरेकामुळे वाळून चालल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी (२४ मे) प्रसिद्ध केले होते. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची प्रतिक्रिया
 ‘नवीन गोष्टींचा शोध अनेकदा पर्यावरणाच्या मुळावर उठतो, हे आपण अनुभवतोच आहोत. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी घरबांधणीपासून, रस्ता, पेट्रोल पंप, सगळीकडे केला जाणारा पेव्हर ब्लॉक्सचा मनमुराद वापर हा नवा प्रकार देखील निसर्गासाठी घातक सिद्ध होत आहे. सर्वत्र पेव्हर ब्लॉक्स आणि सिमेंट काँक्रिटचा कहर होत असल्याने पावसाचे पाणी मुरण्यास वावच नाही, अशी स्थिती आहे. शहरी माणसांना मातीचे एवढे वावडे आहे, की पायाला चिखल लागू नये म्हणून मोकळी जमीन सोडायचीच नाही, असा चंगच आपण बांधला आहे. देशात बुद्धीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहराची महापालिका तर याबाबतीत अडाण्यासारखी वागत असते. रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करताना रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या कंपाउंड भिंतीपर्यंत सिमेंट किंवा डांबर ओतून महापालिकेने सगळ्याच वृक्षवल्लीची कत्तल चालवली आहे. छोटी झुडपे, गवत तर जवळपास नष्टच झाले आहे. घरे बांधण्यासाठी शासकीय परवानगीने झाडे संपवली जात आहेतच, त्यामध्ये आता अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही मारली जात आहेत. त्यामुळे काही वर्षांमध्ये वृक्षहीन शहर म्हणून पुण्याची ओळख होईल. रस्त्यावर वर्षांनुवर्षे उभ्या असलेल्या झाडासाठी पावसाचे पाणी जिरावे म्हणून झाडाभोवती आळे करण्याऐवजी झाडाच्या बुंध्यापर्यंत सिमेंट किंवा डांबर टाकून झाडाचा गळा दाबण्यात येत आहे. या परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना हाती घेऊन महापालिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे श्वास मोकळे करावेत आणि सोसायटय़ा, सार्वजनिक ठिकाणे येथे पेव्हर ब्लॉक्सचा वापर कमीतकमी करण्यात यावा. शहरात उघडय़ा जमिनीचे अस्तित्व थोडे तरी टिकून राहील आणि पावसाचे थोडेफार तरी पाणी जमिनीत मुरेल असे बघावे. पुण्यातील सुशिक्षित नागरिकांनी देखील पायाला माती लागल्यास वाईट वाटून घेऊ नये, असे आवाहन करावेसे वाटते.’
लोकसत्ता व्यासपीठ :
झाडे अशीच मरू द्यायची का?
झाडांचे महत्त्व सर्वाना माहीत आहे, ती सर्वाना हवीसुद्धा आहेत. मात्र, ती योग्य पद्धतीने राखली जात नाहीत. शहरात पूर्ण वाढ झालेली, सावली व प्राणवायू देणारी हजारो झाडे आहेत. मात्र, त्यांच्याभोवती काँक्रिट-डांबर फासल्याने ती वठण्याची भीती आहे. शहरात पावलो पावली हेच दिसते.. याबाबत शहराचा सुजाण नागरिक म्हणून आपले काय मत आहे? हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? या संदर्भात आपले मत सांगा. शिवाय आपल्या परिसरात अशी झाडे असतील, तर त्यांची माहिती आणि शक्य झाल्यास त्याचा फोटोसुद्धा ई-मेलवर पाठवा.
आमचा पत्ता-
लोकसत्ता, एक्स्प्रेस हाउस, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ५
ई-मेल- loksattapune@gmail.com

Story img Loader