विनोद सातव (तपास अधिकारी, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त)
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीला दोषी ठरविले आहे. हे सर्व टीम एफर्टस् आहेत. मुंबई, पुणे दहशतवाद विरोधी पथक, पुणे गुन्हे शाखामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात मोलाचे सहकार्य केले. एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांचे तपासात मार्गदर्शन होते. त्याच बरोबर विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सरकार पक्षाची बाजू न्यायालयासमोर व्यवस्थित मांडली, अशी प्रतिक्रया या गुन्ह्य़ाचे तपास अधिकारी आणि एटीएसचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त विनोद सातव यांनी दिली.

राजा ठाकरे (विशेष सरकारी वकील)
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हिमायत बेगला न्यायालयाने दोषी धरले आहे. त्याला दोषी धरण्यात आलेल्या काही कलमांमध्ये मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते.

अॅड. ए. रेहमान (बेगचे वकील)
न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार आहोत. त्याचबरोबर १८ तारखेला बेगच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. बेगचे वय कमी आहे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा होऊ शकते. या वेळी त्याला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया बेगचे वकील अॅड. ए. रेहमान यांनी दिली.

स्नेहल खरोसे (जर्मन बेकरीच्या मालक)
आम्ही आजच्या निर्णयामुळे आनंदी आहोत. आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली तरच मृतांना आणि जखमींना न्याय मिळेल. गेली तीन वर्षे ही माझ्या जीवनातील कठीण होती. त्यातून खूप काही शिकण्यास मिळाले. बॉम्बस्फोटानंतर जर्मन बेकरी पुन्हा उभी राहिल्यानंतर अनेक प्रश्न आहेत, अशी प्रतिक्रिया जर्मन बेकरीच्या मालकीण स्नेहल खरोसे यांनी दिली.