मराठीतील प्रकाशक आणि पत्रसंग्राहक ह. वि. ऊर्फ हरिभाऊ मोटे यांच्या आत्मचरित्रावरील मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह असलेले ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. फेसबुक, एसएमएस आणि व्हॉट्स अॅपच्या जमान्यात या पत्रलेखन कलेचे वैविध्य उलगडणाऱ्या या पुस्तकातून समकालीन वाङ्मयीन वास्तवावर प्रकाशझोत टाकला गेला आहे.
पद्मगंधा प्रकाशनतर्फे हरिभाऊ मोटे यांच्या ‘सर्वमंगल क्षिप्रा’ या आत्मचरित्रावरील मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह असलेले ‘सर्वमंगल क्षिप्राबद्दल’ हे पुस्तक गुरुवारी (१७ मार्च) प्रकाशित होत आहे. प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक अंजली सोमण यांनी या पत्रांचे संपादन केले आहे. हरिभाऊंचे मानसपुत्र आणि पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास लेखक प्रा. मििलद जोशी आणि कवयित्री अंजली कुलकर्णी उपस्थित राहणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. दि. पुंडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
‘विश्रब्ध शारदा’ या पत्रात्मक द्वि-खंडाचे संपादक आणि प्रकाशक म्हणून ह. वि. माटे यांना ओळखणारी माणसेही आता थोडी राहिली आहेत. मोटे यांना पत्रे गोळा करण्याचा छंद होता. पत्रव्यवहार हे विचार पोहोचविण्याचे माध्यम आता नाहीसे होत असताना हे पुस्तक वाचकांच्या हाती सुपूर्द करताना आनंद होत असल्याची भावना अंजली सोमण यांनी व्यक्त केली. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्षेत्रात विचारांची देवाणघेवाण आणि त्यांचे संवर्धन केवळ पत्रांतून होत असे. मन मोकळे करण्याबरोबरच प्रेमभावनाही व्यक्त होत असत. पत्रव्यवहाराचे महत्त्व माहीत असलेली माणसे समाजात वावरत असताना हरिभाऊंचा हा उर्वरित पत्रसंग्रह प्रकाशात यावा, हा या पुस्तक निर्मितीमागचा उद्देश असल्याचे प्रकाशक अरुण जाखडे यांनी सांगितले.
मोटे यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर समकालीन पिढीतील अनेक जाणकार आणि मर्मज्ञ रसिकांनी या पुस्तकाच्या निमित्ताने पत्रव्यवहार केला. हा केवळ सर्वसाधारण पत्रव्यवहार नसून तो सांस्कृतिक दस्तऐवजच आहे. या पत्रांतून तत्कालीन वाङ्मयीन व्यवहार समजण्यास मदत होते. तसेच पत्रव्यवहाराची मौलिकताही लक्षात येते. पत्रे बोलकी असतात. ती भूतकाळाबद्दल बोलत असतात. त्यांना वर्तमानाचा संदर्भ असतो आणि ती भविष्याचे विविधरंगी सूचन करतात. वाचक या पत्रांना भिडतील आणि त्यातील अनाहत नादांचा अनुभव घेतील, असा विश्वास जाखडे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा