पुणे – राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात इयत्ता तिसरीच्या ३० टक्केपेक्षा जास्त मुलांना लहान मजकूर, पाचवीपर्यंतच्या ४१ टक्के मुलांना त्यांच्या श्रेणीचा योग्य मजकूर वाचता येत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विद्यार्थी भाषा नैसर्गिकरित्या शिकतात. मात्र विद्यार्थ्यांनी वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. इयत्ता दुसरीमध्ये मुलांना वाचन येणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून वाचन होत नसल्याचे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत राज्यातील तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल ओघवते वाचन करू शकेल, आठवीपर्यंतचे प्रत्येक मूल शिकण्यासाठी वाचू शकेल हे सुनिश्चित करणारी आनंददायी वाचनाची चळवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने आता राज्यात वाचन चळवळ राबवली जाणार आहे. या वाचन चळवळीत शालेय शिक्षण विभाग, राज्यसरकार, युनिसेफ, रीड इंडिया आणि प्रथम बुक्स या संस्थांचा सहभाग आहे.

हेही वाचा – पुणे स्थानकावर ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’! प्रवाशांसाठी अनोखी सुविधा सुरू

मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांकडून मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. राज्यातील शासनमान्य शाळा आणि खासगी शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. मात्र खासगी शाळांना पुस्तके दिली जाणार नाहीत. उपक्रमात वर्षभरातील काही तारखा निश्चित करून शाळेत वाचन वर्ग आयोजित केले जातील. त्यात विद्यार्थी पुस्तकांची देवाणघेवाण करतील. त्याशिवाय शालेय स्तरावर शाळेच्या वेळापत्रकातच साप्ताहिक दोन वाचन तासिकांचा समावेश करणे, गोष्टींचा रविवार उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी ई-पुस्तके उपलब्ध करून देणे, आनंदाचा तासअंतर्गत ‘ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड’ या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या वेळापत्रकात किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी १५-२० मिनिटे शिक्षक आणि मुलांसाठी कथा पुस्तके वाचण्यासाठी आनंदाचा तास वेळा पत्रकात समाविष्ट केला जाईल.

हेही वाचा – पुणे : ‘ससून’चा कारभार अधांतरी! नवीन अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा आदेशच नाही

ब्रँड अ‍ॅम्बेसिडरची नियुक्ती

मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी लोकसहभाग, मुलांना वाचनाचे महत्त्व समजावणे, मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करणे, मुलांवर चांगले संस्कार करणे, कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकांतून रसास्वादाची दृष्टी निर्माण करण्याचा या चळवळीचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडरची नियुक्ती केली जाणार आहे.

Story img Loader