‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाचायला वेळ आहे कुठे अशी सबब सांगितली जाते. पण, आवड असेल तर सवड मिळतेच हे जाणून वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘फक्त एक रुपया द्या आणि हवे ते पुस्तक वाचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. नव्या वर्षांची सुरुवात वाचनाने करावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
‘साहित्य दरबार’ पुस्तकालयातर्फे पौड रस्त्यावरील एमआयटी शाळेच्या प्रांगणात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. सासवड येथे साहित्याचा दरबार भरत असताना जे या संमेलनास जाऊ शकत नाहीत त्यांनी या साहित्य दरबारामध्ये यावे अशी संकल्पना आहे. त्या दृष्टीने बुधवारपासून (१ जानेवारी) नवीन वर्ष सुरू होत असताना या उपक्रमाचाही प्रारंभ होत आहे. फक्त एक रुपया द्या आणि आपल्याला हवे ते पुस्तक मनसोक्त वाचा असा हा उपक्रम २६ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात राबविण्यात येणार आहे. एका वेळेस २५ जण बसून पुस्तक वाचू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एका दिवसात किमान १०० साहित्यप्रेमी वाचन करू शकतील अशी अपेक्षा आहे. ज्यांना ग्रंथखरेदी करावयाची आहे त्यांच्यासाठी २०० रुपयांच्या खरेदीवर १० टक्के सवलत, एक हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर २०० रुपये किमतीचे पुस्तक भेट आणि दीड हजार रुपयांच्या खरेदीवर ‘मृत्युंजय’ भेट अशी सवलत देण्यात येणार असल्याचे विनायक धारणे यांनी सांगितले.
हवे ते पुस्तक वाचा फक्त एक रुपयात!
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘फक्त एक रुपया द्या आणि हवे ते पुस्तक वाचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. नव्या वर्षांची सुरुवात वाचनाने करावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
First published on: 31-12-2013 at 02:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading sahitya darbar books new year