Kasba Peth constituency by election: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी या जागेवरुन पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच २०१९ साली अगदी ऐनवेळी आपलं तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कापलं होतं असंही रुपाली पाटील-ठोंबरेंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थाचं विधान करताना त्यामागील कारणाबद्दलही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सोमवारी पत्रकारांशी संवाद साधाना रुपाली पाटील-ठोंबरेंनी, “कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई यांचं निधन झालं आहे. त्या आजारी होत्या. त्याच्याऐवजी जी पोटनिवडणूक लाढणार आहे त्यामध्ये पक्षाने जर आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. पण ही पोटनिवडणूक जाहीर झाली पाहिजे. आम्ही तर तयार आहोत पक्षाच्या आदेशासाठी. पक्षाने आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत,” असं म्हटलं आहे.
यावेळेस पत्रकारांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटत नाही का तुम्हाला? असा प्रश्न रुपाली पाटील-ठोंबरेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मुळात एक लक्षात घ्या २०१९ ला जी निवडणूक झाली त्यामध्ये मुक्ताताई आमदार झाल्या. त्या तेव्हापासून आजारी होत्या. बिचाऱ्या त्यांनी त्या आजारातसुद्धा जेवढं शक्य होतं तेवढं काम केलेलं आहे. त्याआधी गिरीष बापट सर ३० वर्ष आमदार होते. पोटनिवडणूक झाल्यानंतर मतदार ठरवतील ना की कोणाला निवडणूक द्यायचं. असं असतं की पोटनिवडणूक बिनविरोध करावी. पण ही अपेक्षा कोणी करावी ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणुका बिनविरोध केल्या असतील. पंढरपूर पोटनिवडणूक, मुंबईत जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेस त्या महिलेला कोणी आणि किती त्रास दिला सगळ्यांनी पाहिलं. जी पोटनिवडणूक लागणार आहे ती अशीच खेळीमेळीत पार पडावी अशी अपेक्षा आहे,” असं रुपाली पाटील ठोंबरेंनी म्हटलं आहे.
“२०१९ मध्ये ज्या कारणासाठी ऐनवेळी माझं तिकीट कापलं ते कारण मुक्ताताई टीळक होत्या. त्या आजारी आहेत. त्यांच्या कुटुंबाला आणि मुक्ताताईंना न्याय देण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. त्यामध्येच माझं तिकीट कापलं गेलं, असं त्यावेळी आम्ही कॉम्प्रमाइज केलं कारण त्या आमच्या सहकारी होत्या. त्या आजारी असल्याने कसबा मतदारसंघामध्ये आमदार विकासाची कामं झालेली नाही. हवं तर तुम्ही लोकांना जाऊन विचारा. त्या पोस्ट टाकत होत्या. त्या स्वत: टाकत होत्या की घरचे टाकत होते तो भाग निराळा झाला. त्यापेक्षाही त्यांना त्या आजाराचा अतोनात त्रास झालेला आहे. मला वाटतं राजकारणामध्ये तब्बेतीपेक्षा कोणतंही पद मोठं नसतं. त्याचा त्रास त्यांना अधिक झाला. त्या आजाराने जास्त ग्रस्त होऊन त्यांचं निधन झालं. मला असं वाटतं की पोटनिवडणुकीमध्ये जनता तो कौल देईल तो मान्य केला पाहिजे,” असंही रुपाली पाटील-ठोंबरेंनी सांगितलं.