पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. यामुळे या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील शेकडो कंपन्यांना फटका बसत आहे. आंबेगावमधील डोंगराळ भागात लागत असलेल्या आगीच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे समोर आले आहे.
हिंजवडी आयटी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात पिरंगुट-कांदळगाव वीजवाहिनीच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. ही वाहिनी आंबेगावमधील डोंगराळ भागातून जाते. या भागात अनेक ठिकाणी जंगल असून, तिथे आगीच्या घटना घडत आहे. एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. गेल्या १५ दिवसांत ३ वेळा अशा घटना घडल्या आहेत. हा डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात महापारेषणच्या अधिकाऱ्यांना अधिक वेळ लागत आहे. गेल्या शनिवारीही (ता.२२) याच कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत करण्यास सुमारे पाऊण तासांचा अवधी लागला.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे दोनशे आयटी कंपन्या आहेत. याचबरोबर शेकडो लघु व मध्यम उद्योग आहेत. या पार्कमधील वीजपुरवठा गेल्या १५ दिवसांत तीन वेळा खंडित झाला आहे. वीज खंडित झाल्यानंतर कंपन्यांना जनित्रावर काम करावे लागते. यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होते. हा खर्च विजेच्या खर्चापेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे कंपन्यांवर नाहक हा खर्चाचा बोजा पडत आहे. आयटी पार्कमधील लघु व मध्यम उद्योगांना याचा मोठा फटका बसत आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
महापारेषणकडून गस्त
आंबेगावमधील डोंगराळ भागात अनेक जण उन्हाळ्यात गवत पेटवतात. यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. वीजवाहिनीच्या जवळ ही आग लागल्यास आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे विद्युत प्रवाह जमिनीत उतरते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. अशा घटना टाळण्यासाठी महापारेषणचे कर्मचारी या परिसरात गस्त घालत आहेत. विशेषत: सुट्यांच्या दिवशी या घटना जास्त घडत असल्याने त्यादिवशीही गस्त घालण्यात येत आहे.
आंबेगावमधील डोंगराळ भागात आग लागल्यानंतर वीजपुरवठा खंडित होत आहे. त्या भागात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागतो. नागरिकांनी गवताला आग न लावल्यास असे प्रकार घडणार नाहीत.- विठ्ठल भुजबळ, अधीक्षक अभियंता, महापारेषण
हिंजवडी आयटी पार्कमधील पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची जबाबदारी ‘एमआयडीसी’कडे आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठ्यासाठी जनित्राचा वापर केला जातो. मात्र, वीज नसलेल्या काळात पथदिवे बंद असतात.- एस. एम. थिगळे, उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)