पुणे : खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे कालच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये दिसले आहे. राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भगवाच फडकणार असून, तो भगवा हा भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा असेल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘शिमग्यावर बोलायचे नसते,’ असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यावर टीका केली. कृषी विभागाच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुदत आज संपुष्टात; विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या निर्णयाबाबत उत्सुकता

फडणवीस म्हणाले,‘दसरा मेळाव्यामध्ये शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेसाठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री शिंदे हे सरकारच्या विकासाच्या मुद्दय़ावर बोलले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला आले होते. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भगवाच फडकणार असून, तो भगवा भाजप आणि शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा असेल.’

हेही वाचा >>> ‘धनुष्यबाण’ चिन्ह आमचेच!; तातडीने निर्णय घेण्याची शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, की मी दोन्हीही भाषणे ऐकली नाहीत. मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूरमध्ये होतो. बातम्यांमधून जे दिसले ते पाहता, उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर झालेला दसरा मेळावा हा मेळावा नसून, शिमगा होता. त्या शिमग्यावर बोलण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही कधी मुख्यमंत्र्यांसारखे भाषण करू शकले नाहीत. ते कायम पक्षप्रमुख या नात्यानेच भाषण करतात. ठाकरे हे मूळ विचारधारा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंध असलेल्यांबरोबर बसणे त्यांनी मान्य केले. त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

‘उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलावा’

पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी शिंदे गटाचा बचाव करताना उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला फारसे महत्त्व न देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे ‘स्क्रिप्ट’ मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखविले, अशी टीका होत आहे. त्याबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की आमच्या स्क्रिप्टचा विचार करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलावा.