शाळेत एका स्वयंसेवी संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत व्याख्यान होते.. विद्यार्थ्यांना आपल्या हक्काची जाणीव होते.. आणि त्यानंतर शाळेत आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, या मागणीसाठी चक्क विद्यार्थीच ‘संप’ करतात.. ही गोष्ट आहे पुण्याजवळील तुकाई माध्यमिक विद्यालयाची. शाळेत सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनीच शाळेवर बहिष्कार टाकला आहे.
पुण्यातील हिंजवडीजवळील दत्तवाडी येथे प्रेरणा शिक्षण संस्थेचे तुकाई माध्यमिक विद्यालय आहे. ही खासगी अनुदानित शाळा आहे. शाळेत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जातात. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्वयंसेवी संस्थेने बालहक्कांवर व्याख्यान ठेवले होते. हक्क या विषयावर बोलताना विषय आपसूकच मुलांच्या ‘विद्यार्थी’ म्हणून असलेल्या हक्कांवर आला. शाळा कशी हवी, विद्यार्थी म्हणून शाळेत काय सुविधा मिळाल्या पाहिजेत, मुख्य म्हणजे शाळेत अशा सुविधा मिळणे ही विद्यार्थी म्हणून आपला हक्क आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. शाळा सुविधा का उपलब्ध करून देत नाही, शिक्षकांना सुविधा का मिळतात, असे प्रश्न पडायला लागले. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि शाळेत आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी चक्क शाळेच्या विरोधात संपाचे हत्यार उपसले.
तुकाई माध्यमिक शाळा मुले आणि मुलींची एकत्रित शाळा आहे. शाळेतील आठवी आणि नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी विद्यार्थ्यांनीच एकत्र येऊन मुख्याध्यापकांना पत्रही दिले आहे. या शाळेत मुले आणि मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. स्वच्छतागृहांची दारे तुटलेली आहेत. शाळेतील अनेक वर्गामध्ये पंखे आणि दिवे नाहीत. पिण्याच्या पाण्याची टाकीही फुटली आहे. त्यामुळे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. या सर्व तक्रारींचे पत्र विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे दिले आहे. जो पर्यंत शाळा सर्व सुविधा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीची मंगळवारी बैठक होणार असून त्यावेळीही विद्यार्थी आपली बाजू मांडणार असल्याचे समजते.
‘‘या प्रकाराची माहिती नाही. संबंधित अधिकारी, मुख्याध्यापकांकडून माहिती घेऊन त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.’’
– तुकाराम गुजर, अध्यक्ष, प्रेरणा शिक्षण संस्था
‘‘जे पुस्तकातून विद्यार्थी शिकतात, त्याचा अवलंब करता येणे म्हणजे शिक्षण. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली, कोणतीही आक्रमक भूमिका न घेता आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, तर त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही.’’
– नकूल काटे, प्रकल्प संचालक, संपर्क
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा