पुणे : आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यभरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरी तीन ते चार अंश सेल्सिअसनी वाढ झाली आहे. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे ऐन हिवाळ्यात लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी, नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी १२.८ अंश सेल्सिअस तर सांगलीत सर्वाधिक २०.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी किमान तापमानात वाढ झाली. सांगलीत २०.२, कोल्हापूरमध्ये १९.९, जळगावात १६.४, सोलापुरात १९.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहिले. कोकण विभागात मुंबईत १९.५, सातांक्रुजमध्ये १८.५, अलिबागमध्ये १५.७, रत्नागिरीत २०.२, डहाणूत १७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मराठाड्यात औरंगाबादमध्ये १५.६, परभणीत १७.५, नांदेडमध्ये १८.२, बीडमध्ये १८.५ तर विदर्भात अकोल्यात सर्वाधिक १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीत १७.०. बुलढाण्यात १५.२, नागपुरात १५.५, वर्ध्यात १७.० अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा : राज्यात आजपासून थंडी कमी, तापमानाच्या पाऱ्यात वाढ
किमान तापमानात वाढ झाल्यामुळे लोकांना ऐन हिवाळ्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमानात झालेली वाढ पुढील चार दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. हलका पाऊस झाल्यास कमाल तापमानात काहीशी घट होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.