पुणे : यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये अकरा टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील रब्बीचे क्षेत्र सरासरी ५४ लाख हेक्टरच्या घरात आहे. मागील वर्षी ५४.६४ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा एक डिसेंबरअखेर ४८.६५ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अकरा टक्क्यांनी घट होऊन रब्बी पेरण्या ८९ टक्क्यांवर स्थिरावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा अपुरा पाऊस झाला आहे. विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. धरणांमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुरेसे आवर्तन मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या मागील वर्षाच्या तुलनेत ८९ टक्क्यांवर स्थिरावल्या आहेत.

हेही वाचा >>>आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ मोठी चोरी; सराफी पेढीतून तीन कोटी ३२ लाखांचा ऐवज लंपास

राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. मागील वर्षी पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे ५४ लाख ६४ हजार ७१६ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा एक डिसेंबरअखेर ४८ लाख ६५ हजार ३२० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या पेरण्या मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ९०.१५ टक्के आणि मागील वर्षाच्या तुलनेत ८९ टक्के झाल्या आहेत. राज्यात रब्बी हंगामात ऊसतोडणीनंतर जानेवारीअखेरपर्यंत पेरण्या होतात. पण, यंदा पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे आता पेरण्यांचा टक्का फारसा वाढण्याची शक्यता नाही.

अपुऱ्या पावसामुळे राज्यभरात रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे. परिणामी पेरण्यांमध्ये घट झाली आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या ज्वारी आणि करडई पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे, अशी माहिती विकास आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक  दिलीप झेंडे यांनी दिली.

ज्वारी, करडईचा पेरा वाढला

मागील हंगामाच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी १०९ टक्क्यांवर गेली असून, राज्यभरात १३ लाख ६४ हजार ३८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडईची पेरणी १२७ टक्क्यांवर गेली असून, ३८ हजार ३४५ हेक्टरवर पेरा झाला आहे. गव्हाची ७८ टक्के, मक्याची ८१ टक्के, इतर तृणधान्यांची ७९ टक्के, कडधान्यांची ७० टक्के तर करडईचा पेरा वाढल्यामुळे तेलबियांच्या पेरण्या ९८ टक्क्यांवर गेल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reasons for decline in rabi season sowing pune print news dbj 20 amy
Show comments