पुणे : महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर शहरात बंडखोरीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पर्वतीपाठोपाठ हडपसर आणि कसबा मतदारसंघात बंडखोरीचे लोण पोहोचले आहे. महाविकास आघाडीमध्ये हडपसर मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरोधात, पर्वतीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरोधात तर कसबा मतदारसंघात काँग्रेस आमदारांना स्वपक्षीय नेत्याकडूनच आव्हान देण्यात आले आहे. या मतदारसंघातील बंड थोपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शहरातील हडपसर, पर्वती, खडकवासला या मतदारसंघावरून पेच निर्माण झाला होता. शिवसेना ठाकरे पक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही होता. तर, जागा वाटपात काँग्रेसला पर्वती मतदारसंघ हवा होता. मात्र, हडपसर आणि पर्वती मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केला होता. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शहरातील दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये हडपसरमधून प्रशांत जगताप आणि वडगावशेरी मतदारसंघातून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना कसब्यातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने अद्यापही शहरातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.
आणखी वाचा-नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
हडपसरमधून शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी आमदार महादेव बाबर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद आहे, असा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी बाबर यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने खेचल्याने नाराज झालेल्या बाबर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. बाबर यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर बंडाची भूमिका जाहीर केली.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा संधी दिली आहे. कसब्यातून निवडणूक लढविण्यासाठी माजी महापौर कमल व्यवहारे याही इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकीट नाकारण्यात आले. या पार्श्वभूमीवर व्यवहारे यांनी शुक्रवारी ‘स्वराज्य’ पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. स्वराज्य पक्षाकडून त्यांना कसबा मतदारसंघ देण्याची तयारीही दर्शविण्यात आली. मात्र, स्वराज्य पक्ष ऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय व्यवहारे यांनी जाहीर केला. सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतरही काँग्रेसने सातत्याने डावलले आहे. त्यामुळे काँग्रेसचा राजीनामा देत असून सोमवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आणखी वाचा-शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!
पर्वती मतदारसंघातही बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे आहे. मात्र, काँग्रेसचे आबा बागुल या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पर्वती मतदारसंघातील उमेदवाराचे नाव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जाहीर झालेले नाही. मात्र, हा मतदारसंघ मिळणार नाही, हे लक्षात आल्याने बागुल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारांच्या नावाची घोषणा न झाल्याने महायुती, महाविकास आघाडीत अस्वस्थता
महाविकास आघाडीतील काँग्रेसने शहरातील केवळ कसबा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने हडपसर आणि वडगावशेरीतील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पर्वती आणि खडकवासला मतदारसंघातील नावे उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून अद्याप एकही जागा जाहीर केलेली नाही. शिवसेना ठाकरे पक्षाला कोथरूड मतदारसंघ मिळेल, असा अंदाज आहे. महायुतीमध्ये भाजपने पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा, खडकवासला मतदारसंघातील नावांची घोषणा केलेली नाही. शिवसेना शिंदे पक्षानेही एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.