केवळ हिंदूूंचाच नव्हेतर बौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा. एवढेच नव्हेतर पुनर्जन्म ही संकल्पना बौद्ध धर्मामध्ये इसवि सनापूर्वीपासून प्रचलित असावी.. कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधाद्वारे महाराष्ट्र नाणक परिषदेचे देवदत्त अनगळ यांनी हा दावा केला आहे.
‘साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ कल्चरल अँड रिलिजन’ची सहावी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आयोजित करण्यात आली होती. धर्म आणि संस्कृती यासंदर्भातील विविध शोधनिबंध या परिषदेत सादर करण्यात आले. देवदत्त अनगळ यांनी मूर्तीच्या अभ्यासाद्वारे बौद्ध धर्मावरील शोधनिबंध सादर केला असून त्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासाला मलेशिया येथील बुद्धिस्ट मिशनरी सोसायटीने १९८३ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘जेम्स ऑफ बुद्धिस्ट विस्डम’ या पुस्तकाचा आधार असल्याची माहिती अनगळ यांनी सोमवारी दिली.
अनगळ म्हणाले, निरनिराळी वैशिष्टय़े असलेल्या बारा मूर्ती या परिषदेमध्ये मांडल्या. आठ, नऊ आणि अकरा शिर म्हणजेच डोकी असलेल्या वैशिष्टय़पूर्ण मूर्ती या शोधनिबंधामध्ये सादर केलेल्या मुद्दय़ाच्या पुष्टय़र्थ दाखविण्यात आल्या. हावभाव, हातांची संख्या, आकार ही या मूर्तीची वैशिष्टय़े आहेत. चीन, म्यानमार, नेपाळ, थायलंड, कंबोडिया या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याचे विवेचन मी परिषदेमध्ये सादर केले. बौद्ध धर्मातील श्रावकापासून ते बोधिसत्त्वापर्यंत अवलोकितेश्वरापर्यंतचा भिक्षूचा प्रवास अनेक जन्मांपासून होतो. ही संकल्पना महायान पंथाच्या दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये प्रत्यक्षात होती. तशा प्रतिमांची किंवा मूर्तीची पूजा भिक्षू करीत असावेत हा निष्कर्ष मी या शोधनिबंधाद्वारे मांडला आहे.