पुण्याचे महापौर लाल दिव्याच्या गाडीतून जाताना दिसले, तर आज ती गोष्ट पुणेकरांना काही विशेष वाटणार नाही; पण महापौरांना गाडी देण्याचा विषय महापालिकेत सर्वप्रथम जेव्हा आला होता, तेव्हा सर्व नगरसेवकांनीच महापौरांना गाडी द्यायला विरोध केला होता. त्यावेळी एक नगरसेवक महापौरांच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांच्या भाषणामुळे महापौरांना गाडी मिळाली. महापालिकेत १९५२ साली घडलेली ही घटना ऐकवत एक्याण्णव वर्षांच्या एका माजी नगरसेवकाने शुक्रवारी गाडीचा इतिहास जिवंत केला.
दिवाळीच्या निमित्ताने पुण्याच्या आजी-माजी नगरसेवकांचे स्नेहमीलन शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. ‘मैत्री राजकारणा पलीकडची’ या संकल्पनेतून झालेल्या या संमेलनाला आजी-माजी नगरसेवक तसेच अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एक्याण्णव वर्षांचे अॅड. ब. ल. शेलार हे संमेलनातील सर्वात ज्येष्ठ माजी नगरसेवक होते. ते महापालिकेवर येरवडय़ातून १९५२ मध्ये निवडून आले होते.
पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस यांना महापालिकेने मोटार द्यावी, असा विषय जेव्हा सभेत आला तेव्हा सणस यांच्याकडे चार-चार गाडय़ा असताना त्यांना कशाला मोटार द्यायची असा पवित्रा घेत सर्व नगरसेवकांनी या विषयाला जोरदार विरोध केला होता. कॅप्टन शंकरराव चाफेकर तेव्हा महापौरांच्या बाजूने उभे राहिले. ‘आज सणस महापौर आहेत; पण उद्या एखादा सर्वसामान्य नागरिक महापौर झाला आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी त्याला लोहगावला जायला लागले, तर तो काय सायकलवरून लोहगावला जाणार का,’ असा प्रश्न चाफेकर यांनी सभेत केला. त्यांच्या या प्रश्नामुळे सर्वाना गाडीची गरज पटली आणि महापौरांना गाडी देण्याचा विषय मंजूर झाला. अॅड. शेलार यांनी सांगितलेली ही आठवण सर्वासाठीच नवीन होती.
अंकुश काकडे यांनी लढवलेल्या महापौर निवडणुकीत पैसे घेऊनही मत न दिलेल्या नगरसेवकाच्या घरी रात्री दोन वाजता गेलो आणि त्याला दिलेले पैसे परत घेऊन आलो, असा रंगतदार किस्सा शांतीलाल सुरतवाला यांनी सांगताच तो सभासद इथे आहे का अशी चर्चाही संमेलनात रंगली. गुरुवर्य बाबुराव घरून बिस्किटे घेऊन येत असत आणि महापालिकेत स्वखर्चाने चहा-कॉफी मागवत. जगताप यांच्या या आणि अशा अनेक आठवणी ऐकवल्या सत्तावीस महापौरांचे स्वीय सहायक म्हणून काम केलेल्या वि. द. भाटवडेकर यांनी.
निवृत्त नगर अभियंता माधव हरिहर यांनी ‘आमचा काळ फार सुखाचा होता, कारण आमच्याकडे आणि नगरसेवकांकडेही त्यावेळी मोबाईल नव्हते’ असे सांगताच उपस्थितांनी मोठी दाद हरिहर यांना दिली. महापालिकेत बाणेर रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये देण्याचा ठराव जो नगरसेवक वाचणार होता तो सभेत झोपला होता. त्यामुळे तो ठराव मी वाचला आणि वाचताना बाणेर ऐवजी बारणे रस्ता असा उल्लेख केला. त्या पैशातूनच आजचा बारणे रस्ता (मंगळवार पेठ) झाला आहे, हे गुपीत सदानंद शेट्टी यांनी यावेळी फोडले.
आमदार गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, डॉ. सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे आणि रवी चौधरी यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वानी मन:पूर्वक कौतुक केले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी ‘वाद आणि मतभेद जरूर असावेत; पण मनभेद असू नयेत. राजकारणात एकमेकांबद्दल विश्वास असावा, प्रेम असावे,’ अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. खासदार वंदना चव्हाण, आमदार मोहन जोशी, विनायक निम्हण, महापौर चंचला कोद्रे, नंदू घाटे, बाळासाहेब शिरोळे, वस्ताद रियाज, पांडुरंग तरवडे, बबन बिबवे, चंद्रकांत छाजेड, शंकरराव निम्हण, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन, वैशाली बनकर, उल्हास व कमल ढोले पाटील, दादासाहेब झगडे, शरद समेळ, व. ना. शिंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा