पुण्यातील वाहन उद्योग आणि बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आहे. या तुलनेत माहिती-तंत्रज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळाले. प्राप्तिकर विभागाकडे जमा झालेल्या कराच्या आकडेवारीवरून पुण्याच्या बाजारपेठेतील हे कल स्पष्ट झाले आहेत.
प्राप्तिकर विभागाकडे १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात जमा झालेली कराची आकडेवारी या विभागाचे पुण्यातील प्रधान मुख्य आयुक्त देवेंद्र प्रसाद शर्मा यांनी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, पुणे विभागात या आर्थिक वर्षांत १ एप्रिलपासून आतापर्यंत १६,१०६ कोटी रुपयाचा प्राप्तिकर जमा झाला आहे. त्यापैकी ७६५० कोटी रुपये मोठय़ा उद्योग समूहांकडून, तर ८४३३ कोटी रुपये वैयक्तिक खाती असलेले उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ केवळ ७ टक्क्य़ांच्या आसपास आहे. उद्योगविश्वातील काही क्षेत्रांमध्ये समाधानकारक चित्र आहे, तर काही क्षेत्रांमध्ये मंदी असल्याचे चित्र आहे.
बांधकाम व्यवसायात या आर्थिक वर्षांत आतापर्यंत खूपच कमी कर जमा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत आतापर्यंतच्या काळात जेवढा प्राप्तिकर जमा झाला होता, त्या तुलनेत या वेळी ९२ टक्के कमी कर जमा झाला आहे. अशीच काहीशी स्थिती वाहन उद्योगात आहे. त्यामुळे या क्षेत्रांवर मंदीचेच सावट असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे पुण्याच्या तुलनेत इतर शहरांमधील बांधकाम क्षेत्रात खूपच मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. औषधनिर्मिती उद्योगातही पुणे विभागात असेच वातावरण आहे. याउलट पुणे ज्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात स्थिती समाधानकारक आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत या क्षेत्रातून १५ टक्के अधिक प्राप्तिकर जमा झाला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातही जास्त प्रमाणात प्राप्तिकर जमा झाला आहे.
काही क्षेत्रांमध्ये गुंतागुंतीचे चित्र आहे. बँकिंग क्षेत्रातून फार काही प्राप्तिकर जमा झालेला नाही. यामुळे या क्षेत्रात समाधानकारक स्थिती नाही. मात्र, त्याच वेळी बँक ऑफ महाराष्ट्रने मोठय़ा प्रमाणात प्राप्तिकर मिळवून दिला आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
वाहन उद्योग व बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट!
पुण्यातील वाहन उद्योग आणि बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आहे. या तुलनेत माहिती-तंत्रज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-12-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recession on vehicle and building const