ज्योत्स्ना प्रकाशनच्या उपक्रमाला ‘लोकसत्ता संपादक शिफारस’

कुमार गटातील मुलांच्या वाचनाची गरज ओळखून, गेल्या पिढीतील लेखकांच्या दर्जेदार दहा कादंबऱ्याचे संक्षिप्त स्वरूपातील दोन संच ‘ज्योत्स्ना प्रकाशन’तर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘ज्योत्स्ना प्रकाशन’ने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे महत्त्व आणि नावीन्य ओळखून ‘लोकसत्ता’ने या संचाची ‘संपादक शिफारस’ म्हणून निवड केली आहे. पुढील काही दिवस हे दोन्ही संच ‘लोकसत्ता’च्या वाचकांना विशेष सवलतीत मिळतील.

मुलांसाठी मराठीत त्यामानाने खूप कमी कादंबरीलेखन झाले आहे. म्हणून त्यांची वाचनाची गरज ध्यानात घेता ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, प्रादेशिक, ग्रामीण, वैज्ञानिक अशा विविध विषयांवरील कादंबऱ्यांची निवड करून या संचात वैविध्य राखण्यात आले आहे. त्यातही मराठीतील वेगवेगळय़ा बोलींचा परिचय नवीन पिढीला होईल याचा आवर्जून विचार केला गेला आहे. या कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण करताना मूळ लेखकाची शैली आणि कादंबरीचा बाजही सर्व लेखकांनी जपला आहे. या संचासाठी निवड झालेल्या दहा कादंबऱ्या कुमारांना तर आवडतीलच, पण प्रौढांनाही पुन्हा वाचायला आवडतील अशा आहेत. इंग्रजीमध्ये जवळपास प्रत्येक गाजलेल्या पुस्तकाची कुमारांसाठीची आवृत्ती प्रसिद्ध केली जाते. मराठीमध्ये प्रथमच होत असलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला ‘लोकसत्ता’ने ‘संपादक शिफारस’ची मोहोर उमटवत वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी प्रोत्साहन दिले आहे.

ज्योत्स्ना प्रकाशनने दोन संचामध्ये संक्षिप्त रूपातील कादंबऱ्यांचे प्रकाशन केले आहे. यातील पहिल्या संचामध्ये श्री. ज. जोशी यांची ‘आनंदी गोपाळ’, हमीद दलवाई यांची ‘इंधन’, शुभदा गोगटे यांची ‘खंडाळय़ाच्या घाटासाठी’, शंकर पाटील यांची ‘टारफुला’ आणि नाथमाधव यांची ‘वीरधवल’ या कादंबऱ्यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या संचामध्ये दि. बा. मोकाशी यांची ‘सूर्यमंडळ भेदिले’, र. वा. दिघे यांची ‘पाणकळा’, लक्ष्मण लोंढे आणि चिंतामणी देशमुख यांची ‘देवांसि जिवे मारिले’, श्री. ना. पेंडसे यांची ‘हत्या’ आणि गो. नी. दांडेकर यांची ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ या पाच कादंबऱ्यांचा समावेश आहे.

‘वाचनसंस्कृती आणि कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण’ विषयावर उद्या परिसंवाद

‘नव्या स्वरूपातील दहा दर्जेदार कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण’ या प्रकल्पाच्या निमित्ताने ‘वाचनसंस्कृती आणि कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण’ या विषयावर ‘लोकसत्ता’ आणि ‘ज्योत्स्ना प्रकाशन’तर्फे गुरुवारी (२७ डिसेंबर) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठ येथील पत्रकार भवन सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या परिसंवादात प्रसिद्ध कादंबरीकार मोनिका गजेंद्रगडकर, संजय भास्कर जोशी, समीक्षक डॉ. मंदा खांडगे, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम आणि ज्योत्स्ना प्रकाशनचे मििलद परांजपे सहभागी होणार आहेत.

‘लोकसत्ता संपादक शिफारस’ कादंबरी संच

संच क्रमांक एक

* आनंदी गोपाळ

* इंधन

* खंडाळय़ाच्या घाटासाठी

* टारफुला

* वीरधवल

संच क्रमांक दोन

* सूर्यमंडळ भेदिले

* पाणकळा

* देवांसि जिवे मारिले

* हत्या

* आम्ही भगीरथाचे पुत्र

संच कोठे मिळतील?

* महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेते

* ज्योत्स्ना प्रकाशनचे मुंबई आणि पुणे येथील कार्यालय

* http://www.jyotsnaprakashan.com हे ज्योत्स्ना प्रकाशनचे संकेतस्थळ

Story img Loader