विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१० सालच्या नियमावलीतील तरतूद दाखवून नेट-सेटधारक प्राध्यापकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. आयोगाच्या नियमावलीतील तरतुदीनुसार नेट-सेटधारक प्राध्यापकांना दोन वेतनवाढी मिळण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाने माहितीच्या अधिकारात प्राध्यापकांना दिली आहे.
यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्राध्यापक बी. बी. बल्लाळ यांनी ही माहिती मिळवली आहे. नेट-सेट परीक्षांमधून सूट मागणारी राज्यातील प्राध्यापकांची ‘एमफुक्टो’ ही संघटना नेट-सेट धारकांविषयी काहीच बोलत नसली तरी यूजीसीनेच या विशिष्ट तरतुदीकडे लक्ष वेधल्यामुळे नेट-सेटधारकांची बाजू समोर आली आहे. याबाबत नेट-सेट धारक प्राध्यापकांची संघटना असलेल्या ‘बेस्टा’चे अध्यक्ष प्रा. अजय दरेकर म्हणाले, ‘‘पीएचडीधारक प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षांमधून सूट मिळण्याची तरतूद आहे. जुन्या नियमानुसार त्यांना तीन तर नव्या तरतुदींनुसार चार किंवा पाच वेतनवाढी मिळतात. ते प्राचार्यपदासाठी तसेच विद्यापीठाच्या निवडणुका लढविण्यासाठीही पात्र ठरतात. हे फायदे नेट- सेटधारक प्राध्यापकांना मिळत नाहीत. त्यांना फक्त पीएचडीसाठीच्या प्रवेश परीक्षेतून सूट मिळण्याची तरतूद आहे. यामुळे नेट- सेटधारकांना त्यांची पात्रता असूनही दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. प्राध्यापकांची संघटना मात्र या मुद्दय़ावर तोंड उघडायला तयार नाही. ‘१९ सप्टेंबर १९९१ ते ३ एप्रिल २००० पर्यंत नेट सेट पात्रता पूर्ण करण्याच्या अटीवर ज्या बिगर नेट- सेटधारक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशा प्राध्यापकांना नेट- सेट मधून वगळून त्यांना निवड श्रेणी लागू व्हावी, याच मुद्दय़ावर सध्या एमफुक्टोकडून भर दिला जात आहे.’’