लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, अशी अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. याचबरोबर शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-“डॉ. दाभोलकरांच्या खुनाला १० वर्षे होऊनही मारेकरी मोकाट का?”; महाराष्ट्र अंनिसचा सरकारला सवाल
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले.
महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने छत्रपतींची वाघनखे परत देण्याची विनंती ब्रिटिश म्युझियमने मान्य केली आहे, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.