करोना संकटातही पुण्यात परदेशी, देशी कंपन्यांशी सामंजस्य करार; ५४ हजार ६४ रोजगार उपलब्ध
प्रथमेश गोडबोले
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत सन २०२० मध्ये परदेशी कं पन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कं पन्यांशी तीन टप्प्यांत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ात तब्बल १८ हजार ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून त्याद्वारे ५४ हजार ६४ रोजगार तयार झाले आहेत. वर्षभरात राज्यात एकू ण आलेल्या गुंतवणुकीपैकी एकटय़ा पुण्यात २० टक्के गुंतवणूक झाली आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, लॉजिटिक्स अशा विविध कंपन्यांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून अमेरिका, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियासह देशातील नामांकित कं पन्यांसोबत जून महिन्यात १४ सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे १७ हजार ४७ कोटींची गुंतवणूक होऊन १६ हजार २३० रोजगार निर्माण झाले. नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड, जपान, स्पेन, सिंगापूर आणि देशातील विविध कंपन्यांसोबत १५ सामंजस्य करार होऊन ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक झाली, तर २३ हजार १८२ रोजगार तयार झाले. डिसेंबर महिन्यात २५ सामंजस्य करार होत ६१ हजार ४२ कोटींची गुंतवणूक झाली, तर दोन लाख ५३ हजार ८८० रोजगार तयार झाले आहेत. या तीन टप्प्यांमधील करारांमध्ये पुणे विभागात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.
याबाबत बोलताना उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, ‘विविध क्षेत्रातील परदेशी आणि देशी कंपन्यांनी पुणे विभागात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या क्षेत्रातील कौशल्ये तरुण-तरुणींनी आत्मसात करण्याची गरज आहे. तरच या गुंतवणुकीतून निर्माण झालेल्या रोजगारांचा फायदा राज्यातील युवक-युवतींना होईल. उत्पादन, माहिती तंत्रज्ञानाबरोबरच, डाटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क यांमध्येही पुण्यात गुंतवणूक होत आहे. पुणे जिल्ह्य़ात पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ,
दोन वर्तुळाकार रस्त्यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, मनुष्यबळाची उपलब्धता, मुबलक जागा आणि मुंबई व नवी मुंबईपासून जवळ असल्याने पुण्याला उद्योगांची पसंती मिळत आहे.’
विविध क्षेत्रातील कंपन्यांशी तीन टप्प्यांत करार
सन २०२० मध्ये जून महिन्यात प्रथमच अॅसेंडास, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी, हेंगली, ग्रेट वॉल मोटर्स आणि हिरानंदानी लॉजिस्टिक पार्क अशा एकूण सात कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे ७३५० कोटींची गुंतवणूक पुण्यात करण्यात आली, तर ७२९२ रोजगार तयार झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सहा विविध परदेशी आणि देशी कंपन्यांशी सामंजस्य करार होऊन ६८८० कोटींची गुंतवणूक झाली, तर १६ हजार ४०२ रोजगार निर्माण झाले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात गोयल गंगा, जीजी मेट्रोपोलिस, ग्रावीस, बजाज ऑटो, अॅम्प्स फार्मटेक्स इंडस्ट्रीज, क्लीन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी आणि सोनाई इटेबल इंडिया या कंपन्यांकडून ४०६१ कोटींची गुंतवणूक होऊन ३० हजार ३७० रोजगार तयार झाले.
२०२० मध्ये पुण्यात आलेली गुंतवणूक
सामंजस्य गुंतवणूक उपलब्ध
करार (कोटींमध्ये) रोजगार
सात ७३५० ७२९२
सहा ६८८० १६,४०२
नऊ ४०६१ ३०,३७०
एकूण २२ १८,२९१ ५४,०६४