पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन करून आरक्षणाची रचना करावी लागणार आहे. ही गोष्ट केली तरच आरक्षण टिकणार आहे. अध्यादेश काढून देण्यात आलेले आरक्षण ही फसवणूक ठरण्याची शक्यता आहे, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालन्यात आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना हा समाज पुढारलेला आहे. मागास नाही, असे नमूद केले होते. त्यामुळे या परिस्थितीत आरक्षण कसे देता येणार, हे आधी स्पष्ट करावे लागेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तीन टप्पे महत्त्वाचे आहेत. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे प्रथम सिद्ध करावे लागेल.
हेही वाचा >>> “मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी चुकीची”, ओबीसी महापंचायतीकडून महामोर्चाचा इशारा
त्यानंतर मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन करावा लागेल आणि मराठा समाजाचे सर्वेक्षण करावे लागेल, या तीन गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच मराठा आरक्षण टिकेल. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल अचूक आणि महत्त्वाचा आहे. सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे. गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारला यासंदर्भात पत्रव्यवहार करून विचारणा केली. मात्र त्याचे उत्तर देण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने काय केले, अशी विचारणाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
अध्यादेश काढून देण्यात आलेले आरक्षण टिकणार नाही. या पद्धतीने आरक्षण दिले तर ती मराठा समाजाची फसवणूक ठरेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाबाबत जास्त माहिती आहे. मात्र गेले दीड वर्षे ते गप्प का बसले, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला.