पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. निसर्गाच्या कुशीत वसलेले माळीण गाव याच दिवशी नेस्तनाभूत झाले. संपूर्ण गाव ढिगाऱयाखाली गाडले गेले आणि मन हेलावणाऱया छायाचित्रांनी सर्वांचा थरकाप उडाला. आज एक वर्ष उलटल्यानंतरही ‘माळीण’करांची वाताहात काही संपुष्टात आलेली नाही. दुर्घटनेतून बचावलेले लोक आजही पुन्हा उभारी घेण्यासाठी अडचणींचा सामना करीत आहेत. कटू आठवणी विसरुन आयुष्याची नव्याने सुरूवात करण्यासाठी दुर्घटनेतून बचावलेल्यांनी पुनर्विवाहाचा आधार घेतला आहे. गेल्या वर्षभरात माळीणमध्ये एकूण २३ पुनर्विवाह झाले आहेत. दुर्घटनेत बळी गेलेल्यांमध्ये सुनील झंझारे(३५) यांच्या कुटुंबियांचाही समावेश होता. झंझारे यांनी या दुर्घटनेत आपल्या पत्नी आणि इतर नातेवाईकांना गमावले. तीन महिन्यांपूर्वी झंझारे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बोथा गावातील आशा या महिलेशी विवाह केला. संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्व पुन्हा उभारण्याची व्यवस्था करणे मला एकट्याला जमणे कठीण होते. तेव्हा माझ्या काकांनी पुन्हा लग्न करण्याचा पर्याय सुचविला. सुरूवातीला मी विरोध केला, मात्र कालांतराने मी एकटा जगू शकणार नसल्याचे लक्षात आल्याने दुसरे लग्न केले, असे झंझारे यांनी सांगितले. दुर्घटना घडली त्यावेळी सुनील झंझारे शेतात पाहणीसाठी गेले होते. त्यामुळे ते बचावले. झंझारे यांच्याप्रमाणेच दिलीप लेंबे (४५) यांचाही तांबे गावातील मनिषा(२६) हिच्यासोबत डिसेंबरमध्ये विवाह झाला. लेंबे यांनी माळीण दुर्घटनेत त्यांची पत्नी, आई आणि दोन मुलांना गमावले आहे. पुनर्विवाह करण्याचा सुरूवातीला दिलीप लेंबे यांचाही विचार नव्हता पण संपूर्ण आयुष्य एकांतात जगायचे? हा प्रश्न निर्माण झाल्याने पुनर्विवाह केल्याचे ते सांगतात. अशाप्रकारे गेल्या वर्षभरात माळीण गावात २३ पुनर्विवाह झाले आहेत. दुर्घटना झाल्याच्या चार महिन्यातच गावात पुनर्विवाह सुरू झाल्याचे     गावचे सरपंच दिगंबर भालची यांनी सांगितले. या दुर्घटनेत ज्यांनी सर्व गमावले त्यांना आपली पुढील पिढी निर्माण होणे आवश्यक वाटले, तर ज्या चिमुकल्यांनी आपल्या आईला गमावले त्यांना आईची माया मिळणे महत्त्वाचे वाटल्याने दुर्घटनाग्रस्त नागरिकांनी पुनर्विवाह केले. झाले गेले गंगेला मिळाले म्हणत प्रत्येक माळीणकर मोठ्या हिमतीने नव्या आपल्या आयुष्याची सुरूवात करत असल्याचेही सरपंच दिगंबर पुढे म्हणाले.

Story img Loader