पहिल्यांदाच व्यापक स्तरावर अभ्यास
चिन्मय पाटणकर
पुणे : भारतीय द्वीपकल्पातील (पेनिन्शुला) गवताळ प्रदेशांत प्रदेशनिष्ठ वनस्पती नसण्याच्या समजाला छेद देणारे संशोधन पुढे आले आहे. भारतीय द्वीपकल्पातील गवताळ प्रदेशात २०६ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची नोंद करण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, द्वीपकल्पाच्या स्तरावर पहिल्यांदाच व्यापक अभ्यास करून गवताळ प्रदेशांतील प्रदेशनिष्ठ वनस्पतींची वाढ नोंदवण्यात आली आहे. या संशोधनामुळे आता जंगलांप्रमाणे गवताळ प्रदेशांच्याही संवर्धनाची गरज अधोरेखित झाली आहे.
भारतीय द्वीपकल्पातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संशोधनासंदर्भातील ‘एक्स्पोनेन्शिअल राइज इन डिस्कव्हरी ऑफ एंडेमिक प्लॅन्ट्स अंडरस्कोअर्स द नीड टू कॉन्झर्व द इंडियन सवानाज’ हा शोधनिबंध ‘बायोट्रॉपिका’ या संशोधनपत्रिकेमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संशोधनामध्ये आशिष नेर्लेकर, आलोक चोरघे, जगदीश दळवी, राजा कुलेस्वामी, सुबैया करुप्पुस्वामी, विघ्नेश कामत, रितेश पोकर, गणेसन रेंगय्यन, मिलिंद सरदेसाई, शरद कांबळे यांचा समावेश आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, तेलंगणा या राज्यांतील काही भागांमध्ये संशोधन करण्यात आले. साधारणपणे दोन वर्षे हा अभ्यास सुरू होता. संशोधन गटातील शास्त्रज्ञानी वैयक्तिक स्तरावर केलेले संशोधन आणि शोधनिबंधांचे मूल्यमापन अशा दोन्ही पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यातून भारतीय द्वीपकल्पातील गवताळ प्रदेशात २०६ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची नोंद झाली.
मुळचे पुणेकर आणि सध्या टेक्सास एम अँड एम विद्यापीठातील इकॉल़ॉजी अँड कॉन्झर्वेशन बायोलॉजी विभागात पीएच.डी.चे शिक्षण घेत असलेले आशिष नेर्लेकर यांचा या संशोधन गटात सहभाग आहे. त्यांनी या संशोधनाबाबत ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘ब्रिटिशांना त्यांच्या व्यापारासाठी जंगलातून मिळणारे लाकूड महत्त्वाचे असल्याने त्यांनी जंगलांच्या तुलनेत गवताळ प्रदेशांना कमी महत्त्व दिले. आजवर पश्चिम घाटातील जंगलांचा विविध प्रजातींचा, प्रदेशनिष्ठ प्रजातींचा बराच अभ्यास झाला आहे. मात्र त्या तुलनेत गवताळ प्रदेशांचा, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास झालेला नाही. या दृष्टीने हे संशोधन करण्यात आले,’ असे आशिष यांनी सांगितले. गवताळ प्रदेशाचे जतन-संवर्धन करताना त्या ठिकाणी अवैज्ञानिक पद्धतीने वृक्ष लागवड करणे टाळले पाहिजे, असे आशिष यांनी सांगितले.
४३ टक्के वनस्पतींचा गेल्या दोन दशकांत शोध
भारतीय द्वीपकल्पातील शोधलेल्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींपैकी ४३ टक्के वनस्पती या गेल्या दोन दशकांतच शोधलेल्या आहेत. येत्या काळात भारतातील गवताळ प्रदेशांचा अभ्यास वाढेल, तशी प्रदेशनिष्ठ वनस्पतींची संख्या आणखी वाढत जाईल, असेही आशिष यांनी नमूद केले.
प्रदेशनिष्ठ वनस्पतींची दोन महत्त्वाची केंद्रे
भारतीय द्वीपकल्पातील गवताळ प्रदेशांतील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या शोधाची दोन महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यात नाशिक, पुणे, कोल्हापूर ते बंगळुरूपर्यंत पश्चिम घाटाचा पूर्व भाग, तर पूर्व घाटाचा दक्षिण भाग यांचा त्यात समावेश होतो, असेही आशिष यांनी स्पष्ट केले.