मार्चअखेरमुळे सध्या राज्यभरात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे. बुधवारी (३० मार्च) एकाच दिवसात राज्यभरात २१ हजार ५०० मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद होऊन तब्बल २६५ कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ एप्रिल रोजी चालू बाजार मूल्यदर (रेडिरेकनर) जाहीर केले जाणार आहेत. तसेच १ एप्रिलपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिकांसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू होणार आहे. त्यामुळेही दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे.

याबाबत बोलताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) सुहास मापारी म्हणाले, ‘मार्चअखेरमुळे चालू आठवड्यात दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. सोमवारी दस्त नोंदणीत अडथळे आले होते. मात्र, त्यानंतर विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मंगळवार आणि बुधवारी दस्त नोंदणी सुरळित झाली. बुधवारी राज्यात विक्रमी २१ हजार ५०० दस्त नोंद झाले. यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने राज्यभरातून एकाच दिवशी दस्त नोंद झाले नव्हते. बुधवारी एकाच दिवसात विभागाला तब्बल २६५ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला.’

हेही वाचा : अधिकाधिक दस्त नोंदणी ऑनलाइन होण्यासाठी विविध उपाययोजना

गुरुवारी ३१ मार्च असल्याने दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तांत्रिक बाबींसाठी स्वतंत्र अभियंत्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. आयसरिता प्रणालीसह विभागाच्या सर्व्हरला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी या पथकाकडून २४ तास देखरेख करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record break stamp duty registration in maharashtra 265 crore revenue collected pune print news pbs