पुण्यातील स.प महाविद्यालयाच्या मैदानावर अमाप उत्साह, तुडुंब गर्दी, उत्कंठा, अशा वातावरणात ठीक साडेसहा वाजता ताशा कडाडला आणि त्यानंतर ढोलाच्या गडगडाटाने आसमंत दाणाणून गेला.. चार हजार ढोल एकाच वेळी बावीस मिनिटे वाजवण्याचा विक्रम शनिवारी पुण्यातील ढोल ताशा पथकांनी केला. त्यानंतर प्रसिद्ध तालवादक ए सिवामणी आणि हजारो ढोल-ताशांमध्ये रंगलेली जुगलबंदीनेही उपस्थितांची मने जिंकून घेतली.
ढोल-ताशा महासंघाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व पथकांच्या एकत्रित वादनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुण्यातील विविध सत्तर पथकांमधील चार हजार दोनशे बारा ढोल-ताशा वादकांनी एकत्रित वादन केले. ढोलाच्या तालावर नाचणारी ध्वजपथकेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. विविध पाच हात या वेळी पथकांनी सादर केले. पुण्यातील पथकांबरोबरच कल्याण, सासवड, तळेगाव, पिंपरी-चिंचवड येथील पथकेही या उपक्रमामध्ये सहभागी झाली होती. सात वर्षांच्या मुलापासून पासष्ठ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत विविध वयोगटातील वादक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मुलींचा सहभागही लक्षणीय होता. यापूर्वी कोल्हापूर येथे एक हजार तीनशे पन्नास ढोल साडेसात मिनिटे वाजवण्याचा विक्रम पुण्यातील ढोल ताशा पथकांनी मोडला. वादकांचा उत्साह, त्याला उपस्थितांकडून मिळणारी दाद आणि सिवामणीची साथ अशा जुळून आलेल्या योगामुळे पंधरा मिनिटांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असतानाही प्रत्यक्ष बावीस मिनिटे वादन करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या विक्रमाची माहिती पाठवण्यात येणार आहे.
त्यानंतर सिवामणीने काढलेले बोल आणि त्याला हजारो ढोल-ताशा वादकांकडून मिळणारे उत्तर अशा रंगलेल्या जुगलबंदीनेही रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सिवामणीच्या एकल वादनातही उपस्थितांच्या टाळ्या आणि ड्रम्स अशी जुगलबंदी रंगली. तबला, ड्रम्स, प्लेट्स, ऑक्टोपॅड, आफ्रिकन ड्रम्स यांबरोबरच झांज, सायकलची बेल, ड्रम्सच्या स्टिक्स, पाण्याचा ड्रम अशा विविध वाद्यांमधून तालाची वेगळीच दुनिया उभा राहिली. रोजच्या वापरातील प्रत्येक गोष्टीमध्ये असणार नाद, त्यामध्ये दडलेले वाद्य उपस्थितांनी सिवामणीच्या वादनातून अनुभवले.
या वेळी ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष अनिल गाडगीळ, अनूप साठे, सरचिटणीस पराग ठाकूर, पोलिस उपायुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, संयोजन समितीचे समन्वयक राहुल सोलापूरकर, विनीत कुबेर पुण्यातील गणेश मंडळांचे प्रमुख, ढोल-ताशा महासंघाचे कार्यकर्ते, सर्व पथकांचे प्रमुख उपस्थित होते.

Story img Loader