दत्ता जाधव
पुणे : नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा तसा दुर्गम आणि डोंगराळ भाग. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले क्षेत्र. मुळा आणि प्रवरा नदीचा उगम याच तालुक्यातील. पावसाळय़ात धो-धो पडणारा पाऊस आणि उन्हाळय़ात पिण्याच्या पाण्यासाठीही करावी लागणारी वणवण, अशी परस्पर विरुद्ध टोकाची परिस्थिती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिसरातील तरुण एकत्र आले आणि त्यांनी एकीच्या जोरावर वरई आणि नाचणीचे उन्हाळी उत्पादन घेतले अन् तेही विक्रमी.
ही घटना आहे अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक सारख्या दुर्गम भागातील. या गावातील वीस तरुण एकत्र आले. त्यांनी क्रांतिवीर सेंद्रिय भात उत्पादक गटाची स्थापना केली. शेतीशाळा घेऊन या गटाला कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) मार्गदर्शन केले. बियाणे निवडीपासून, रोपवाटिका तयार करणे, रोपांची वाढ, तयार रोपांची लागण आणि खतांची मात्रा, पिकांची काढणी आणि अगदी शेवटी बाजारपेठ शोधून देण्यापर्यंतची सर्व मदत आत्माच्या माध्यमातून देण्यात आली.
सामान्यपणे खरिपातच नाचणी आणि वरईचे पीक घेतले जाते. तेही क्षेत्र आता सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येच शिल्लक राहिले आहे. कमी उत्पादकता, मागणी नसणे, प्रक्रिया उद्योगांचा विकास न होणे आदी कारणांमुळे पोषक तृणधान्यांचे क्षेत्र जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे. पण, अलिकडे शहरी जीवनशैलीचे विपरीत परिणाम समोर येऊ लागल्यानंतर तृणधान्यांची मागणी वाढली आहे. कृषी विभागाने पुढाकार घेऊन उन्हाळी हंगामात केवळ भुईमूग पीक घेऊन न थांबता नाचणी, वरईचे पीक घेण्याचे आवाहन केले. स्थानिक तरुणांनी आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे आणि चांगले बियाणे, खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे एकरी आठ ते नऊ क्विंटल उन्हाळी नाचणी आणि वरईचे उत्पादन मिळाले आहे. नियमित खरिपातील उत्पादन सहा ते सात क्विंटल प्रति हेक्टरी असताना उन्हाळी हंगामात आलेले विक्रमी उत्पादन शेतकरी आणि कृषी विभागाचे उत्साह वाढविणारे ठरले आहे.
आदिवासी भागात उन्हाळी वरई, नाचणी उत्पादन घेण्याच्या पथदर्शी प्रयोगाला चांगले यश आले आहे. आदिवासींच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासह शहरी लोकांना पोषक तृणधान्य उपलब्ध होणार आहेत. आता परिसरात प्रक्रिया उद्योग वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यंदाच्या खरिपासह पुढील उन्हाळी हंगामातील नाचणी, वरईचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन आहे.
बाळनाथ सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा), अकोले