१ फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात * विमानतळाला गती
प्रथमेश गोडबोले, लोकसत्ता
पुणे : पुण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शहरातील कार्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी येत्या १ फेब्रुवारीपासून रुजू होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रशासकीय कामकाजाला वेग येणार आहे.
विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य प्रशासकीय कामकाजासाठी शहरात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी – एमएडीसी) कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नुकत्याच मुंबईत मुलाखती झाल्या. विमानतळ उभारणीशी संबंधित विविध विभागांशी या कार्यालयातून समन्वय साधण्यात येणार आहे.
विमानतळाच्या भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकारी म्हणून सात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. भूसंपादनाबरोबरच प्रकल्पग्रस्तांना परतावा देणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आदी विभागांशी समन्वय साधून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुण्यात एमएडीसीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील या कार्यालयाचे समन्वय अधिकारी म्हणून दीपक नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘पुण्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार निवृत्त उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), नायब तहसीलदार, लिपीक आणि लघुलेखक प्रत्येकी एक अशा चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांबाबत एमएडीसीच्या संचालक मंडळाची मान्यता घेण्यात आली असून या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या १ फेब्रुवारीपासून रूजू होण्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे’, अशी माहिती पुरंदर विमानतळाच्या कार्यालयाचे समन्वय अधिकारी दीपक नलावडे यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार नियोजन विभागाच्या निवृत्त सहसंचालकांची नियुक्ती या कार्यालयात करण्यात आली आहे. हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी सध्या मुंबईतील एमएडीसीच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ते लवकरच पुण्यातील कार्यालयात रुजू होणार आहेत. विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीसाठी सिडको, एमआयडीसी, पीएमआरडीए यांची भागभांडवलापोटी काही रक्कम एमएडीसीकडे वर्ग झाली आहे. या कार्यालयामुळे विमानतळाच्या कामकाजाला वेग येणार आहे.
पुण्यातील कार्यालय पुरंदर तालुक्यात
शहरात शिवाजीनगर येथे सुरू करण्यात आलेले पुरंदर विमानतळाचे कार्यालय काही कालावधीनंतर पुरंदर तालुक्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सहज उपलब्ध होण्यासाठी त्याठिकाणी हे कार्यालय उपलब्ध असावे, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी शिवाजीनगर येथील विमानतळाचे कार्यालय असलेल्या इमारतीमध्येच पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ लि. (वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – डब्लूएमडीसी) आणि एमआयडीसी यांच्या कार्यालयांच्या जागा वापराविना पडून आहेत. या दोन्ही विभागांच्या जागाही भाडेतत्त्वावर विमानतळाच्या कामकाजासाठी घेण्यात येणार आहेत.