सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नवे शैक्षणिक वर्षही मनुष्यबळाच्या कमतरतेतच काढावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली दोन वर्षे विविध वाद आणि शासनाच्या निर्णयांमध्ये अडकलेली विद्यापीठाची अ आणि ब वर्गातील अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया आता रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे वाट पाहणाऱ्या उमेदवारांची आता निराशा होणार आहे.
विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जवळपास पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी प्रक्रिया सुरू केली. मात्र, अद्यापही ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया सुरू होऊन आता दोन वर्षे होत आहेत. परिणामी आतापर्यंत झालेली भरतीची प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठात अ वर्गाच्या अधिकाऱ्यांची ९० आणि ब वर्गातील ९२ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या विद्यापीठात अ गटाचे ४३ आणि ब गटातील ४५ अधिकारीच कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ३० एप्रिल २०१३ ला विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली. उपकुलसचिव, वित्त व लेखाअधिकारी, सहायक कुलसचिव, जनसंपर्क अधिकारी, कक्षाधिकारी, हिशोब तपासनीस अशा ६३ पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. मात्र, प्रक्रिया सुरू होऊन दोन वर्षे झाली, तरीही अद्यापही भरती पूर्ण झालेलीच नाही. ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून विविध वाद, शासनाचे निर्णय आणि विद्यापीठाची दिरंगाई यांमुळे भरतीची प्रक्रिया लांबली.
अर्ज आलेले असताना भरतीसाठी वर्षभर चाळणी परीक्षा घेण्यातच आली नाही. ही परीक्षा १६ फेब्रुवारी २०१४ ला घेण्याचे विद्यापीठाने सुरुवातीला जाहीर केले. मात्र परीक्षा पुढे ढकलत ती २० जुलै २०१४ ला घेण्यात आली. ही प्रक्रिया सुरू करतानाच शासनाच्या निर्णयांचा विचार करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे पदासाठी दिलेल्या अनुभवाचा विचार न करता अर्ज केलेल्या सर्वाचीच चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा वादांमध्ये अडकली. आरक्षणाच्या निकालानंतर १२ ते १४ ऑगस्ट २०१४ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर आरक्षणाबाबत चित्र स्पष्ट होत नसल्यामुळे प्रक्रिया थांबवण्यात आली. आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर २१ फेब्रुवारी २०१५ ला शासनाने आरक्षणाबाबत सुधारित निर्णय जाहीर केला. त्यानंतरही लगेच पुढील कार्यवाही करत ही प्रक्रिया पूर्ण करणे विद्यापीठाला शक्य होते. मात्र, विद्यापीठाकडून पुढील कार्यवाही झाली नाही.
‘भरती प्रक्रियेबाबत व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेण्यात येईल. याबाबत परिषदेची समितीही नेमण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात येईल. भरतीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची वेळ आलीच, तरीही नव्या शैक्षणिक वर्षांत विद्यापीठाला मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. प्रक्रिया नव्याने सुरू झाली तरीही ती जून-जुलैपर्यंत पूर्ण होऊ शकते.’
– डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ