पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्याची सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने महापालिकेला केली आहे. त्यानुसार शहरातील सर्वेक्षणासाठी महापालिकेने उपायुक्त चेतना केरुरे यांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली १ हजार ७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या अहवालाचा वापर आरक्षणाच्या पूर्ततेसाठी करण्याचे नियोजन आहे.  महापालिकेच्या परिसरातील सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने उपायुक्त चेतना केरुरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच घरोघरी जाउन सर्वेक्षणासाठी १ हजार ५ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक १५ कर्मचाऱ्यामागे एक सुपरवायजरची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी संकलित केलेल्या माहितीचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>माझ्या प्रचाराला अजितदादाच येणार, शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे विधान

सर्वेक्षणासाठी शहरात २ हजारांहून अधिक प्रगणक लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार पाच प्रगणकांचा आदेश काढण्यात आला असून  सर्वेक्षणाची माहिती घरोघरी जावून ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने उपयोजन तयार केले आहे. त्यातील ४० पानी अर्जावर सर्व प्रश्न घेण्यात आले आहेत. शासनाकडून आदेश आल्यानंतर प्रत्यक्षात सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात होईल. प्रत्येक प्रगणकाकडे १०० कुटुंबांचे सर्वेक्षणाचे काम देण्यात येणार असून १५ दिवसांत त्यांना हे काम पूर्ण करावे लागणार आहे.