लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जिल्ह्यात ७५८ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार असून, त्याबाबतची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण अशी आहे. भरतीची जाहिरात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर लावण्यात आली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
महिला आणि बालकिवास विभागाच्या वतीने ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची ७५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.
अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रियेवेळी शैक्षणिक अर्हतेसह अन्य काही निकषांची तपासणी होणार आहे. इयत्ता बारावीमधील टक्केवारी, पदवीधर, पदव्युत्तर गुण पाहिले जाणार असून, विधवा, अनाथ, प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांक दिले जाणार आहेत.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांना योग्य कागदपत्रांसह स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादी जाहीर करण्यता येणार असून, यादीवर हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर गुणांकानुसार पदनियुक्तीचा आदेश पंचायत समिती स्तरावरून काढण्यात येणार आहे.