पुणे : राज्यभरातील लाखो उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदभरती करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय खुला राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रात रिक्त पदांसाठी संबंधित जिल्ह्यातील उमेदवारच पात्र ठरत असल्याने त्या पदभरतीस राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्रामविकास विभागामार्फत जिल्ह्याच्या प्रमुखांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे.