जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नौरोसजी वाडिया महाविद्यालयासह अन्य संस्थांतर्फे शनिवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळत नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील टाटा असेंब्ली हॉल येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये खासगी क्षेत्रातील ६ हजार ६४३ पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : सराफ बाजारात महिलेकडील सात लाखांचे दागिने चोरले
नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय, टॅलेंट कॉर्प सोल्युशन, भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँड स्पोर्टस असोसिएशन यांचा मेळावा आयोजनात सहभाग आहे. मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या ६ हजार ६४३ पदांसाठी सहभाग नोंदवला आहे. दहावी-बारावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या पात्रताधारकांची भरती या रिक्त पदांवर केली जाईल. अधिक माहिती http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना संकेतस्थळाद्वारे पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन नोंदवता येतील. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, अर्ज, आधारकार्डाच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. नोकरीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले.