पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांच्या मोटारीवरील लाल दिवा, तसेच पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मोटारीवरील अंबर दिवा काढून टाकण्याचे आदेश शुक्रवारी उशिरा पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, तातडीने कार्यवाही करण्यात आली.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर दिवा बसवण्याविषयी स्पष्ट तरतुदी आहेत. मात्र, तरीही विनापरवाना मोटारीवर दिवे लावले जातात, अशी प्रकरणे उघड होऊ लागल्यानंतर शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदींना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले. ४ जून २०१३ ला शासनाने याबाबतचे परिपत्रकही  काढले होते. त्यानुसार, ज्यांना दिवा वापरण्याची परवानगी आहे, अशांनीच तो वापरणे, तसेच परवानगी नसताना दिवा वापरल्यास तो तातडीने काढून टाकण्याची कारवाई बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर, शासनाने सुधारित आदेश काढला, त्यानुसार, क वर्ग दर्जा असलेल्या महापालिकांचे आयुक्त व महापौरांनाही दिवा वापरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पिंपरी पालिका ‘क’ वर्ग दर्जात मोडते. त्यामुळे महापौर व आयुक्तांच्या मोटारींवरील दिवे काढून घ्यावेत, असे आदेश पालिकेला प्राप्त झाले. त्यानुसार, सायंकाळी तशी कार्यवाही करण्यात आली. या माहितीस पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
दरम्यान, पिंपरीचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मोटारीवरील दिव्याचे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. आयुक्तांशिवाय अन्य अधिकाऱ्यांना दिव्याची मोटार वापरता येत नसतानाही शिंदे बिनधास्त दिव्याची हौस भागवून घेत होते. पालिकेत आल्यानंतर ते दिवा काढून ठेवत होते आणि बाहेर जाताना मोटारीवर दिवा लागलेला आहे, असे अनेकदा दिसून आले होते. आता आयुक्तच दिवा वापरणार नसल्याने अतिरिक्त आयुक्तांच्या मोटारीच्या दिव्याचा विषयदेखील निकाली निकाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा