नगर-कल्याण रस्त्यावरील आणे गावाच्या हद्दीत शासकीय सील असलेल्या रक्तचंदनाचा कंटनेर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडला. या कंटेनरमध्ये दोन कोटी चोवीस लाख रुपयांचे दहा हजार सातशे किलो वजनाचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. कंटेनरला शासकीय सील असल्यामुळे त्याचे गूढ वाढले असून, यामागे मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले, की आणे गावाच्या हद्दीत संशायवरून एक कंटेनर ताब्यात घेतला. या कंटेनरला शासकीय सील असल्यामुळे त्यामध्ये काय आहे, याची माहिती घेण्यात आली. त्या वेळी चालकाने, रांजणगाव एमआयडीसी येथून कंटनेरमध्ये माल भरून आणला असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तो गडबडला. कंटेनरवर नाव्हाशेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा शासकीय सील असल्याचे दिसून आले. त्या चालकाकडे अधिक चौकशी केल्यानंतर, मोटारीमध्ये रक्तचंदन असल्याचे समजले. रस्त्यात एका ठिकाणी दुसऱ्या कंटेनरमधून यामध्ये रक्तचंदन भरल्याचेही चालकाने सांगितले. त्यामुळे कंटेनरबाबत अधिक चौकशी केल्यानंतर कंटेनरच्या इंजिनचा क्रमांक खोडण्यात आल्याचे, त्याच बरोबर कंटेनरचा क्रमांक व चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना सर्व खोटे असल्याचे दिसून आले.
या कंटेनरमध्ये दोन कोटी चोवीस लाख रुपये किमतीचे दहा हजार सातशे किलो वजनाचे रक्तचंदन होते. ते जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चालक तौकीर ईर्शाद खान (वय ३१, रा. ताजपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा-कळंबोली, नवी मुंबई) याला अटक केली आहे. या प्रकरणात मोठी साखळी असल्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रानमाळे हे अधिक तपास करत आहेत.                                  (संग्रहित छायाचित्र)