लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम आणखी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ‘सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द करण्यात आला असून, त्या ऐवजी पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आला आहे,’ असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी जाहीर केले. ‘रेल्वेमार्गासाठी ‘जीएमआरटी’चे स्थलांतर केले जाणार नाही,’ असेही ते म्हणाले.

वैष्णव यांनी शनिवारी पाषाण येथील ‘सी-डॅक’ संस्थेला भेट दिली. तसेच, मध्य रेल्वे विभागातील कामकाजाचा आणि प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील खोडद येथे ‘जीएमआरटी’ हे वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे. पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारकडून तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर या रेल्वेमार्गामुळे या केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती. तसेच स्थानिक नागरिकांनीही भूसंपादनास विरोध दर्शवल्याने हा रेल्वे मार्ग प्रकल्प गेल्या दीड वर्षापासून रखडला आहे,’ असे वैष्णव यांनी सांगितले.

आणखी वाचा-एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार

ते म्हणाले, ‘जीएमआरटी प्रकल्प केवळ भारतासाठीच नाही, तर २३ देशांसाठी महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे. या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वांत शक्तिशाली वैज्ञानिक संशोधन केंद्राची क्षमता कमी करणे होईल. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे रेडिओ लहरी प्रभावित होऊन, संशोधनाला अडचण होईल. सध्या पुणे-दौंड-अहिल्यानगर-मनमाड हा रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे ‘जीएमआरटी’ प्रकल्पाला धक्का न लावता, पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे. हा रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर- शिर्डी- नाशिक असा असणार आहे.’

‘रेल्वे मंत्रालयाचे महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे. सुमारे एक लाख ७० हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. त्यातही मध्ये रेल्वेच्या पुणे विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, त्यातील काही अंतिम टप्प्यात आहेत. पुणे ते लोणावळा तिसरी मार्गिका लवकरच पूर्ण होईल,’ असेही वैष्णव यांनी सांगितले.

आणखी वाचा-एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार

उरुळीत नवीन टर्मिनल

‘पुणे रेल्वेस्थानकावर प्रवासी आणि मालवाहतूक, तसेच रेल्वेगाड्यांची दुरुस्ती अशा कारणांनी नियोजनावर ताण पडत आहे. परिणामी, गाड्यांना विलंब, प्रवाशांना सुविधा न मिळणे अशा तक्रारी आहेत. याची दखल घेऊन पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उरुळी येथे नवीन टर्मिनल उभारण्यात येत आहे. या नव्या टर्मिनलमध्ये प्रवासी रेल्वेगाड्यांच्या (एक्स्प्रेस, मेल) दुरुस्तीचे काम करण्यात येईल. त्यामुळे प्रवासी गाड्या, सुटण्याच्या नियोजित वेळेपूर्वी पुणे रेल्वे स्थानकात येऊन रवाना होतील. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल,’ असे अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले.

पुणे मुंबई नवीन रेल्वे मार्गिका

‘पुणे आणि मुंबई ही दोन शहरे आणखी जवळ येण्याच्या दृष्टीने रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे. पुणे-मुंबई रेल्वेमार्गात घाट असल्याने अंतर आणि प्रवासाचा वेळ वाढतो. हा वेळ कमी करण्यासाठी नवा रेल्वेमार्ग तयार करण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास दोन शहरांमध्ये वंदे भारत रेल्वेही आगामी काळात धावतील. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला आणखी वंदे भारत रेल्वेगाड्या देण्यात येतील,’ असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

Story img Loader