पुणे : खडकी रेल्वे स्थानक हे ‘कोचिंग टर्मिनल’ म्हणून विकसित करण्यात येत असून, येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहेत. त्यानंतर या स्थानकावरून चेन्नई आणि बंगळुरू या प्रमुख ठिकाणांसह दक्षिणेकडे रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी खडकी आणि हडपसर या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. खडकी स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन प्रतीक्षेतील गाड्यांच्या वेळापत्रकात सुसूत्रता आणणे शक्य होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सद्य:स्थितीत पुणे रेल्वे विभागाच्या मुख्य स्थानकावरून लांब पल्ल्याच्या आणि बाहेरून येणाऱ्या १२० ते १५० गाड्या धावतात. या गाड्यांतून एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दी वाढत असल्याने पायाभूत सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागाने खडकी आणि हडपसर या स्थानकांसह अन्य स्थानकांवर पुनर्विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी खडकी रेल्वे स्थानक हे ‘कोचिंग टर्मिनल’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. या स्थानकांच्या फलाटांची उंची वाढविण्यात येणार आहे. या कामांसाठी रेल्वे बोर्डाकडून ३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खडकी रेल्वे स्थानकावरून चेन्नई आणि बंगळुरू या प्रमुख ठिकाणांसह दक्षिण भागात रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन असून, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी
पुणे स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्याने आणि गर्दीमुळे अनेकदा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. अनेक गाड्यांना विलंब होतो. हा विलंब टाळण्यासाठी खडकी रेल्वे स्थानकावरून गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतीक्षेत असणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होऊन पुणे रेल्वे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.
खडकी रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यामध्ये फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. दोन ते अडीच महिन्यांत ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात येतील. त्या दृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. – हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी