पुणे : राज्यभरातील शाळांतील शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रारूप तयार करण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांना शैक्षणिक वेळापत्रक दिले जाणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. गेली अनेक वर्षे अशैक्षणिक कामे कमी करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. ‘आम्हाला शिकवू द्या,’ अशी मोहीम सुरू करण्याची वेळ, अशैक्षणिक कामांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांवर मध्यंतरी आली होती. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या कामांचे शैक्षणिक आणि अशैक्षणिक असे वर्गीकरण करण्यात आले. तसेच निवडणूक, जनगणना अशी काही अशैक्षणिक कामे शिक्षकांना करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नुकतेच वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी-२चे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार यंदा एप्रिलअखेरपर्यंत परीक्षा चालणार आहेत. शाळांचा लांबत चाललेला कालावधी आणि त्यात अशैक्षणिक कामांची भर, यामुळे शिक्षकांवर आणखी भार येईल, अशी शक्यता आहे. या अनुषंगाने ‘लोकसत्ता’ने शालेय शिक्षणमंत्र्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

‘विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ हे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळणेही गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या कामांतील ३० ते ५० टक्के कामे कमी करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे प्रारूपही तयार करण्यात आले आहे. निवडणुकीसारखी काही कामे शिक्षकांना करावी लागतील. मात्र, बराचसा ताण कमी होणार आहे. शिक्षकांनी अधिकाअधिक वेळ अध्यापन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. या प्रारूपाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षात केली जाणार आहे. शाळांना वर्षाच्या सुरुवातीलाच शैक्षणिक वेळापत्रकही देण्यात येणार आहे,’ असे भुसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकही आनंदी राहिले पाहिजेत. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आहे, राज्यातील अनेक शिक्षक समर्पित भावनेने काम करतात. सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे. – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

Story img Loader