पुणे : देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा भार वाढला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सुमारे ३५ कोटी लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या आणि आता १२५ लोकसंख्या असतानाही ६० टक्के लोकसंख्या शेती आणि शेती संलग्न व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीवरील हा भार कमी करण्याची गरज आहे. संपूर्ण कुटुंबाने शेती करण्याऐवजी कुटुंबातील काही सदस्यांनी अन्य उद्योग, व्यवसाय करून शेतीवरील भार कमी केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वाकड (पिंपरी चिंचवड) येथे झालेल्या  ६२ व्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, कृषी आयुक्त धीरज पवार, देश-विदेशातून आलेले शास्त्रज्ञ, शेतकरी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पवार म्हणाले, देशातील कृषी शास्त्रज्ञांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. ते वेगवेगळय़ा पिकांवर संशोधन करीत आहेत. देशातील सर्व पिकांची संघटना असली पाहिजे, यासाठी मी कृषिमंत्री असताना आग्रही होतो. त्याप्रमाणे डािळब, आंबा, सीताफळसारख्या पिकांच्या संघटनाही तयार झाल्या आहेत. पण, या सर्व संघटनांत द्राक्ष बागाईतदार संघटनेने केलेले काम पथदर्शी आहे.  देशातून होणाऱ्या एकूण द्राक्ष निर्यातीत राज्याचा वाटा ९८ टक्के आहे. करोना काळात शेतीमाल निर्यातीने देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे.

चीन, रशियाला निर्यात घटली 

करोनानंतर चीनने द्राक्ष आयातीचे निकष कडक केले आणि हे निकष ऐनवेळी कळविले. द्राक्षबागा, शीतगृहे, निर्यात व्यवस्थेची ऑनलाइन तपासणी करण्यात वेळ गेल्यामुळे चीनला अपेक्षित निर्यात होऊ शकली नाही. युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियातील कृषी निर्यातीवर परिणाम झाला. तरीही यंदा द्राक्ष निर्यातीत वाढ झाली आहे.

Story img Loader