देशात विविध योजनांवर देण्यात येत असलेल्या अनुदानाच्या खर्चात कपात करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधानांच्या अर्थविषयक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी रविवारी व्यक्त केले. उद्योग व व्यवसायांना अनुदान दिले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
माजी कॅबिनेट सचिव बी. जी. देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशदा व जनवाणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, यशदाचे महासंचालक संजय चहांदे, उद्योगपती अरुण फिरोदिया, अभय फिरोदिया, जनवाणीचे अध्यक्ष विजय केळकर, संचालक किरण कुलकर्णी, रवी पंडित आदी त्या वेळी उपस्थित होते.
रंगराजन म्हणले, सरकारकडून विविध योजनांसाठी अनुदान दिले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत अनुदानापोटी दोन टक्के खर्च करण्यात येतात. हा खर्च १.७ टक्क्य़ांपर्यंत कमी करण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक अनुदान कमी करणे ही आजची गरज आहे. दुसरीकडे उद्योग व व्यवसायांना अनुदान दिले पाहिजे.
तेलाच्या आयातीवर सध्या मोठय़ा प्रमाणावर खर्च होत असून, त्यासाठी अधिक पैसे हवे असल्याने सामान्यांवर भार लावण्यात आला आहे, असे सांगून ते म्हणाले, देशात आर्थिक दृष्टीने हव्या असणाऱ्या भरभराठीसाठी आवश्यक गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. दुसरीकडे सोन्याची गुंतवणूक वाढली आहे. ही गुंतवणूक अनुत्पादक स्वरूपाची असून, ती देशाच्या अर्थगतीस लाभदायक नाही. 

Story img Loader