पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत २०२०च्या तुलनेत यंदा गैरप्रकार घटल्याचे निदर्शनास आले. यंदा बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
करोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या होत्या. यंदा त्या सर्व सवलती रद्द करून करोना काळापूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक आणि पोलीस बंदोबस्त, भरारी पथकांच्या भेटी, सहायक परीरक्षकाकडून प्रश्नपत्रिकांची वाहतूक करताना जीपीएस ट्रॅकिंग आणि चित्रीकरण, जनजागृती आदी उपाययोजनांचा त्यात समावेश होता.
राज्य मंडळाने जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणांचा उपयोग करूनही काही गैरप्रकार झाले. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात पसरवणे, कॉपीसाठी साहाय्य करणे, धमकी देणे, खंडणी अशा प्रकरणांचा त्यात समावेश होता. राज्य मंडळाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार करोना प्रादुर्भावापूर्वी २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ५८० आणि बारावीच्या परीक्षेत ९९६ गैरप्रकारांची नोंद झाली होती. तर यंदा दहावीच्या परीक्षेत ११३ आणि बारावीच्या परीक्षेत २६० गैरप्रकारांची नोंद झाली. त्यामुळे २०२० च्या तुलनेत यंदाच्या परीक्षेत गैरप्रकारांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.
कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे २०२० च्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार घटल्याचे दिसून येते. अकरा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केल्याने काही प्रमाणात गैरप्रकारांना चाप बसली. पुढील वर्षी अधिक चांगल्या पद्धतीने कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.