पुणे : यंदाच्या उसाच्या गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादनात सुमारे दहा लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ९० ते १०२ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात सुमारे दहा लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सुमारे सात लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करण्यात आला होता, तर ११० लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा १२ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात येणार असून, निव्वळ साखर उत्पादन ९० ते १०२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. पण, राज्य आणि देशपातळीवरील एकूण गाळप, साखर उत्पादनाचा अंदाज सातत्याने चुकतो आहे.
हेही वाचा >>>डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करणारे कुलपती पायउतार; गोखले संस्थेतून डॉ. देबराय यांचा राजीनामा
यंदा प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विविध नद्यांना आलेला पूर, अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम उसाचे गाळप आणि साखरेच्या उताऱ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सोलापूर, मराठवाड्यातील कमी पावसाच्या भागातही चांगला पाऊस झाला आहे. परतीचा मोसमी पाऊस चांगला पडण्याचा अंदाज आहे. हंगाम पंधरा दिवस उशिराने सुरू होणार असल्यामुळे प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनात आणि साखरेच्या उताऱ्यात वाढ होण्याचा अंदाज विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबर आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>>“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”
कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यात यंदा ११.६७ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. सरासरी प्रतिहेक्टर ८६ टन उत्पादनाचा अंदाज आहे. लागवड, चारा, गुऱ्हाळघरे आणि रसवंतीसाठी उपयोग होणारा ऊस वगळून एकूण ९०४ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. सरासरी ११.३० टक्के उतारा मिळून एकूण १०२ लाख टन साखर उत्पादन होईल. त्यांपैकी १२ लाख टन साखरेचा वापर इथेनॉलसाठी होईल आणि निव्वळ साखर उत्पादन ९० लाख टन होण्याचा अंदाज आहे. मिटकॉन या संस्थेने १०२ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीचा परिणाम होणार
यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण, याच काळात राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असणार आहे. सहकारी साखर कारखान्यांवर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचे वर्चस्व आहे. तर अनेक खासगी कारखाने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी आणि दुसरीकडे गाळपाची लगबग, अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे गाळप हंगामावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.