पावलस मुगुटमल
पुणे : संपूर्ण मार्च महिन्याबरोबरच एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत़ यामुळे महिन्याभरात राज्यात धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात सुमारे नऊ ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या पाणीसाठय़ाशी तुलना केल्यास या कालावधीत यंदाचा पाणीसाठा दहा टक्क्यांनी अधिक आहे.
यंदा पावसाळय़ाचा कालावधी सुमारे महिनाभर लांबला होता. त्याचप्रमाणे अवकाळी पावसानेही वेळोवेळी राज्याच्या सर्वच भागांत हजेरी लावली होती. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांत पाण्याचा मोठा आणि समाधानकारक साठा जमा झाला होता. बहुतांश धरणे शंभर टक्के भरली होती. फेब्रुवारी अखेरीपर्यंत धरणांत सुमारे ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. मार्च महिन्यामध्ये मात्र उन्हाचा चटका वाढला. पहिल्या आठवडय़ानंतर तर कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली. मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही उष्णतेच्या लाटेचा दुसरा टप्पा आला. संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र राहिल्या. याच कालावधीत धरणांतून शेतीसाठी पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा होण्याबरोबरच उन्हाच्या कडाक्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवनही झाले. मार्चच्या सुरुवातीला राज्यातील धरणांमध्ये एकूण सुमारे ७० टक्के पाणीसाठा होता. त्यात मार्चमध्ये झपाटय़ाने घट झाली. सध्या धरणांतील पाणीसाठा ६१ ते ६२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हवामान विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार एप्रिलमध्येही राज्याच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात पाणीसाठय़ात आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या असलेला पाणीसाठा गतवर्षीच्या पाणीसाठय़ाच्या तुलनेत मात्र समाधानकारक आहे. सध्या ६१ ते ६२ टक्के पाणीसाठा आहे, तो गतवर्षी याच कालावधीत ५३ ते ५४ टक्के इतकाच होता. पाणीसाठय़ाबाबत सर्वाधिक चिंता नागपूर विभागामध्ये आहे. या विभागात सध्या ४६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो याच कालावधीत ५३ टक्क्यांहून अधिक होता. राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नाशिक आदी सर्व विभागांत पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट होत असली, तरी तेथील साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक आहे. पुणे विभागात सर्वाधिक ६८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा सध्या धरणांत आहे.
धरणांतील विभागवार पाणीसाठा
विभाग सध्या गतवर्षी
अमरावती ५९.६२ टक्के ५४.६३ टक्के
औरंगाबाद ६६.०६ टक्के ६०.८४ टक्के
कोकण ५९.५२ टक्के ५५.१३ टक्के
नागपूर ४६.८३ टक्के ५३.७३ टक्के
नाशिक ५७.६८ टक्के ५४.७१ टक्के
पुणे ६८.९८ टक्के ४८.९४ टक्के