पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाने २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांत विद्यार्थ्यांकडून ॲड हॉक (तात्पुरते) शुल्क घेतले होते. मात्र या दोन वर्षांत घेतलेल्या शुल्कातील अधिकची रक्कम महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांना परत करावी किंवा वळती करून घ्यावी लागणार आहे.
शुल्क नियामक समितीने या बाबतचे आदेश दिले आहेत. महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय २०२१-२२ कार्यान्वित झाले. महाविद्यालयाने २०२१-२२ आणि २०२२-२३ या पहिल्या दोन वर्षांसाठी ॲड हॉक तत्त्वावर शुल्क निश्चिती केली. मात्र त्यात आकारलेले अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश शुल्क नियामक समितीने दिले होते. मात्र महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी शुल्क नियामक समितीला पत्र पाठवून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीचे शुल्क समितीकडून मान्य करून घेण्याबाबत आणि दोन वर्षांत घेतलेल्या शुल्कातील अधिकचे शुल्क २०२३-२४ या वर्षीच्या शुल्कात वळते करण्याबाबत कळवले होते.
हेही वाचा >>> राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ; मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची हजेरी
शुल्क नियामक समितीचे सदस्य शिरीष फडतरे म्हणाले, की नवीन महाविद्यालयाला दोन वर्षे ॲड हॉक तत्त्वावर शुल्क घेण्याची मुभा असते. त्यानुसार पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाने दोन वर्षांसाठी घेतलेल्या ॲड हॉक शुल्कातील अधिकची रक्कम विद्यार्थ्यांना परत करावी किंवा पुढील शैक्षणिक वर्षात ती रक्कम वळती करून घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.