पुणे: न्यायालयाने आदेश देऊनही बलात्काराचा गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या हडपसर पोलिसांना लष्कर न्यायालयाने खडसावले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना न्यायालयाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली आहे.
या प्रकरणात एका पीडित महिलेने विशाल सूरज सोनकर (रा. वानवडी) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ॲड. साजिद शाह यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. विवाहाच्या आमिषाने संशयित आरोपीने बलात्कार; तसेच अनैसर्गिक कृत्य करुन आर्थिक फसवणूक केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. पीडित महिलेची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रार अर्जात म्हटले होते. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पीडित महिला हडपसर पोलीस ठाण्यात गेली. तिने न्यायालयाच्या आदेशाची प्रत पोलिसांना दाखवली आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने महिलेच्या अर्जावर ६ ऑक्टोबर अर्जावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी ॲड. साजीद शाह यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर केला. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असे ॲड. शाह यांनी सांगितले.