पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सुविधांमध्ये अनेक त्रुटी असल्या, तरी सुधारणांच्या अनुषंगाने नक्कीच प्रयत्न केले जातील. त्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, वेळोवेळी सूचना केल्यास नक्कीच ‘पीएमपी’ सुलभ आणि गतिशील होईल,’ अशी ग्वाही ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. दरम्यान, कार्यक्रमात उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी मांडल्यानंतर मुंडे यांनी ‘पीएमपी’ सेवेत नक्कीच सुधारणा करण्यात येतील, अशी स्पष्टोक्ती दिली.
‘सजग नागरिक मंच’ आणि ‘पीएमपी प्रवासी मंच’ यांच्या सहभागाने रविवारी आयोजित ‘पीएमपी प्रवासी मेळावा’ कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. ‘पीएमपी प्रवासी मंचा’चे जुगल राठी, संजय शितोळे, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ‘पीएमपी’ प्रशासनाच्या सेवांबद्दल टिप्पणी केली.
मुंडे म्हणाल्या, ‘आयुर्मान संपलेल्या ३०० पेक्षा अधिक बस जून महिना अखेरपर्यंत मोडीत काढून नव्याने ६०० बस ताफ्यात घेण्यात येणार आहे. अपघात रोखण्यासाठी ‘अपघात विरहीत पीएमपीएमएल सेवा’ अभियान राबविले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नवीन मार्गिका सुरू करण्यासाठी मागणी होत आहे, त्यानुसार या मार्गांवर बस सुरू करण्यात आल्या आहेत.’
‘पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षम करून वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला आहे. त्यातही ‘पीएमपी’ला चार हजारांपेक्षा अधिक बसची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ५०० आणि पुणे महानगरपालिकेकडून ५०० अशा एक हजार बस, तर केंद्र सरकारकडून एक हजार अशा दोन हजार बस ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
‘‘पीएमपी’कडे राजकारण्यांची अनास्था दिसून येते. पालकमंत्री अजित पवार यांनी नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ मार्गिका काढून टाकण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. मात्र, याबाबत नागरिकांचा अभिप्राय, हरकती, सूचना विचारात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजकारण्यांना प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी व्यक्त केले.
उपस्थितांमधून प्रश्नांचा भडिमार
उपस्थितांमधून ‘पीएमपी’च्या नवीन बस सेवेपासून अचानक रस्त्यात बंद पडणाऱ्या बस, मार्गांवर असलेल्या आणि थांब्यांवर न थांबणाऱ्या बस, वापरात असलेल्या थांब्यांवर प्रवाशांसाठी अपुरी आसनक्षमता आणि प्रकाशव्यवस्था, एकाच मार्गावर पाठोपाठ चालणाऱ्या बस, त्यामुळे इतर मार्गिकांवर बसची कमतरता, ‘पीएमपी’स्थानकावर किंवा बसमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण आदी प्रश्न विचारले.
उपस्थितांमधून ‘पीएमपी’च्या नवीन बस सेवेपासून अचानक रस्त्यात बंद पडणाऱ्या बस, मार्गांवर असलेल्या आणि थांब्यांवर न थांबणाऱ्या बस, वापरात असलेल्या थांब्यांवर प्रवाशांसाठी अपुरी आसनक्षमता आणि प्रकाशव्यवस्था, एकाच मार्गावर पाठोपाठ चालणाऱ्या बस, त्यामुळे इतर मार्गिकांवर बसची कमतरता, ‘पीएमपी’स्थानकावर किंवा बसमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण आदी प्रश्न विचारले.