स्वर्गामध्ये स्वागत करणारे ‘अग्नि’देव.. रुद्रवीणा या वाद्याला लाभलेला डॉ. कलाम यांचा चेहरा.. आपणच निर्मिलेल्या क्षेपणास्त्रावर स्वार होऊन उड्डाण करणारे कलाम.. ‘सर, तुमचा परिचय करून देण्याची गरज नाही. सर्व जगाला तुमची माहिती आहे,’ या शब्दांत कलाम यांचे स्वागत करणारे इंद्रदेव.. आकाशामध्ये झेपावणाऱ्या क्षेपणास्त्रातून बाहेर पडणाऱ्या धुराला लाभलेला कलाम यांच्या केशरचनेचा आकार.. नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून चितारलेल्या व्यंगचित्र आणि अर्कचित्रांच्या माध्यमातून ‘मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले.
‘कार्टूनिस्ट कम्बाईन’तर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावरील व्यंगचित्र आणि अर्कचित्रांचा समावेश असलेल्या ‘कलाम सलाम’ या प्रदर्शनाचे उद्घाटन एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ लेखिका शकुंतला फडणीस यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष चारुहास पंडित, गंगोत्री ग्रीनबिल्ड संस्थेचे मकरंद केळकर आणि गणेश जाधव या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये ४४ व्यंगचित्रकारांनी चितारलेल्या ८० हून अधिक कलाकृतींचा समावेश आहे. त्यामध्ये तीन महिला चित्रकारांनीही सहभाग घेतला आहे. बालगंधर्व कलादालन येथे बुधवापर्यंत (१२ ऑगस्ट) दररोज सकाळी साडेदहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
‘कलाम या नावामध्येच कला सामावलेली आहे. त्यामुळेच कलाकारांनी आपल्या कलेद्वारे डॉ. कलाम यांना अभिवादन करण्याची कल्पना स्तुत्य आहे,’ असे सांगून भूषण गोखले म्हणाले,‘भारताला मोठी क्षमता देणारे डॉ. कलाम हे अष्टपैलू होते. १२० कोटी भारतीय हीच त्यांची संपत्ती होती. प्रत्येकाला कार्यप्रवण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्यांचे खास वैशिष्टय़ होते. हवाई दलामध्ये काम करताना मी पायलट होतो. पण, कलाम यांनी मोठय़ा स्वप्नपूर्तीच्या ध्येयासाठी देशाला पंख दिले.’
व्यंगचित्र म्हणजे विनोद किंवा चित्रातून केलेली राजकीय टीका अशीच व्यंगचित्रांबाबतची समजूत आहे. पण, या माध्यमातून डॉ. अब्दुल कलाम या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदरभाव व्यक्त करता येतो हे दाखवून देण्याचा आम्हा व्यंगचित्रकारांचा प्रयत्न असल्याचे चारुहास पंडित यांनी सांगितले.

Story img Loader