पुणे : ‘आकलन संस्थे’तर्फे एस. एम. जोशी प्रतिष्ठानच्या रामकृष्ण मुंडकर सभागृहात आयोजित प्राध्यापक राजेंद्र व्होरा स्मृतिव्याख्यानात ‘रायटिंग अ रिजन इन इंडियन हिस्ट्री’ या विषयावर प्रा. प्राची देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोलकाता येथील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल सायन्स’ येथे त्या प्राध्यापक आहेत. ‘आकलन’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक-अभ्यासक सुहास पळशीकर या वेळी उपस्थित होते.

प्रा. प्राची देशपांडे यांनी सोमवारी प्रदेश, प्रादेशिक भावना यांचा विचार कशा पद्धतीने करायला हवा, त्याचे ऐतिहासिक संदर्भ नेमके काय आहेत, आपल्या सामाजिक रचनेवर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होत असतो… अशी मांडणी केली. इतिहासाकडे पाहताना प्रादेशिकता किती महत्वाची असते आणि त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहता आले तर आपल्या मूलभूत संकल्पनांना छेद देता येतो, इतिहासातून नवे काही तरी शोधता येते हे देशपांडे यांनी या वेळी स्पष्ट केले. राष्ट्र ही संकल्पना, राष्ट्रवाद आणि त्यातून सध्याच्या काळात निर्माण झालेल्या टोकदार संवेदना, नवे प्रश्न देशपांडे यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. प्रा. देशपांडे म्हणाल्या, ‘टोकाच्या प्रादेशिक संवेदना एकाच पक्षाच्या वर्चस्वाला कारणीभूत ठरतात. त्यातूनच पुढे अनेक वाद, प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे प्रादेशिकतेकडे अमुकवादी-तमुकवादी, पुरोगामी-प्रतिगामी असे शिक्के न मारता अधिक समावेशक दृष्टिकोनातून पाहायला हवे. त्यातील संवाद, लवचीकता आणि सहसंबंधांकडे लक्ष द्यायला हवे.’

‘मानवी कल्पनेतून प्रदेशांची निर्मिती होते. भाषा, संस्कृती, प्राचीन ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडी हे त्याचे विशेष भाग असतात. एका प्रदेशाची, भाषेची आणि संस्कृतीची निर्मिती होण्यामागे अनेक भौगोलिक-सामाजिक व्यवहार कारणीभूत असतात. त्यांचा परिणाम सध्याच्या समाजाच्या राजकीय-सामाजिक समीकरणांवर होत असतो. प्रादेशिकता का देशी ही भावना आपल्या सामाजिक रचनेवर थेट परिणाम करत असते. त्यामुळे त्याचा विचारही व्यापक अर्थाने करायला हवा. देशीवादाने अनेक अडचणी निर्माण होतील, असे म्हणले जाते. मात्र, त्यामुुळे देशीवादाविषयी विचारच न करणे चुकीचे आहे. स्थानिक संवेदना अधिक टोकदार होण्यामागे जागतिकीकरणाचाही वाटा मोठा आहे. त्यामुळे प्रदेशाचा, स्थानिकतेचा, देशीयतेचा विचार व्यापकतेनेच करायला हवा. देशी किंवा देशीवादाला अधिक व्यापकतेने पाहता आले, तर आपल्याला इतिहासाचाही नव्याने विचार करता येईल. त्यातून नवे काही तरी शोधता येईल,’ असे मत ही प्राध्यापक प्राची देशपांडे यांनी व्यक्त केले.

Story img Loader