पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून कोटांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या ८ जूनपासून व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच केंद्रीय प्रवेशासाठी प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरणे गरजेचे आहे.

राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे आणि चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोटा अंतर्गत प्रवेशासाठी ८ ते १२ जून या कालावधीत नोंदणी करावी लागेल. शून्य फेरी अंतर्गत १३ जून रोजी कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटा अंतर्गत प्रवेशासाठी विद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. विद्यालयांना १३ ते १५ या कालावधीत कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. तसेच १६ ते १८ जून या कालावधीत कोटानिहाय रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी रिक्त जागांवर पुन्हा पसंतीक्रम नोंदवू शकतील.

हेही वाचा – पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस ठाम; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

‘फेरी क्रमांक एक’ या फेरीतील विद्यार्थ्यांची निवड यादी १९ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. येत्या २३ जून नंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार यांनी स्पष्ट केले. अधिक माहिती https://11thadmission.org.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Story img Loader